
मुंबई :
वांद्रे येथील बीकेसी परिसरात असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजला बॉम्बस्फोट होणार असल्याचा एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच व्यक्तीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला अशाच प्रकारे बॉम्बस्फोटाचा ईमेल पाठविला होता, आता त्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत मेल आयडीवर ही धमकी पाठविली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी धमकीचा मेल पाठविणार्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे.
यातील तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून सोशल स्टॉक एक्सचेंज येथे सिनिअर मॅनेजर म्हणून कामाला आहे. १३ ते १४ जुलैला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत ईमेलवर एका अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोटाच्या धमकीचा एक मॅसेज पाठविला होता. हा मॅसेज कॉमे्रड पिनाराई विजयान नावाच्या एका अज्ञात व्यक्तीने पाठवला होता. त्यात संबंधित कार्यालयाच्या सर्व इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडीस ठेवले असून दुपारी तीन वाजता पहिला बॉम्बस्फोट होईल अशी धमकी दिली होती. या धमकीची माहिती नंतर बीकेसी पोलिसांना देण्यात आली होती. या धमकीनंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजसह इतर सर्व इमारतीची तपासणी करण्यात आली होती. मात्र तपासणीनंतर बॉमबची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीवरुन बीकेसी पोलिसांनी कॉमे्रड पिनाराई विजयान याच्याविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन भीतीयुक्त वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा मेल कोणी पाठविला, तो कोठून आला होता यासाठी गुन्हे शाखेसह सायबर सेलची माहिती घेतली जात आहे. दोन दिवसांपूर्वी याच व्यक्तीने बॉम्ब स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा एक ईमेल पाठविला होता. या धमकीनंतर एमआरए मार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही धमकीचे ईमेल एका व्यक्तीच्या नावाने आणि मेलवरुन पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.