
मुंबई :
अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरूवारी सकाळी १० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीसाठी मुंबई विभागातून २ लाख ७१ हजार ६० जागांसाठी ७९ हजार ४०३ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाली. यामध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ३७ हजार ८४५ विद्यार्थ्यांना मिळाले. यामध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये मुंबई विभागातून ८७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये जाहीर झालेल्या ७९ हजार ४०३ जागांमध्ये वाणिज्य शाखेतून सर्वाधिक ४३ हजार ३५४ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या. त्याखालोखाल विज्ञान शाखेच्या २८ हजार ८२२ विद्यार्थ्यांना तर कला शाखेच्या ७ हजार २२७ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाली आहे. यामध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ३७ हजार ८४५ विद्यार्थ्यांना मिळाले. यामध्ये वाणिज्य शाखेतील १८ हजार ४४२, विज्ञान शाखेतील १४ हजार ६५१ आणि कला शाखेतील ४ हजार ७५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय १३ हजार १७७ विद्यार्थ्यांना मिळाले. यामध्ये वाणिज्य शाखेतील ७ हजार १९१, विज्ञान शाखेतील ४ हजार ९१७ आणि कला शाखेतील १ हजार ६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच तिसऱ्या पसंतीक्रमाचे ८ हजार ९६० विद्यार्थी यांना मिळाले आहे. यामध्ये वाणिज्य शाखेतील ५ हजार २२७, विज्ञान शाखेतील ३ हजार १०९ आणि कला शाखेतील ६२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा दाखल
मुंबईसह राज्याच्या विविध विभागांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज काही तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने पहिल्या यादीत स्वीकारले गेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या यादीत नव्याने नोंदणी झालेल्या १ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी अनेक विद्यार्थी ९० किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण मिळालेले होते. त्यामुळ बहुतांश महाविद्यालयांमध्ये पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीच्या कट-ऑफमध्ये नगण्य फरक पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. दुसऱ्या यादीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलैदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तसेच दुसऱ्या फेरीमध्ये शिल्लक राहिलेल्या जागांचा तपशील २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये मुंबई विभागातून ८७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर जवळपास ५२ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले होते.