
मुंबई :
जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना आता बाल रोग विभागामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने बुधवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वसतिगृहातील खोलीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. डॉक्टरवर तातडीने उपचार करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती ठीक आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे.
जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर गुप्ता यांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वसतिगृहातील त्यांच्या खोलीमध्ये औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच या प्रकाराची माहिती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. गुप्ता यांच्या उत्तर प्रदेशमधील आई वडिलांना कळवण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, या प्रकाराची चौकशी करण्यासाठी रुग्णालय स्तरावर एक आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने एक अशा दोन स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. या समितींचा अहवाल आल्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण कळू शकेल, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.