
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित एक अपत्य किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या सुखी कामगार दांपत्याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हाफकिन महामंडळाचे मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे सरचिटणीस तथा संचालक, कामगार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले दीपक रामदास पेडणेकर आणि दर्शना दीपक पेडणेकर यांनी एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्याबद्दल अंबादास गायकवाड, मुंबई राज्य उपाध्यक्ष, प्रहार दिव्यांग शासकीय संघटना यांच्या हस्ते रुपये पाच हजार धनादेश, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ, सौभाग्यलेन, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नागनाथ घाडगे, स्वास्थ शिक्षण अधिकारी मुंबई पोर्ट ट्रस्ट, अनिल तावडे, गुणवंत कामगार, नंदू पारकर, अध्यक्ष, सेंच्युरी मिल एकता मंच , महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण अधिकारी श्री कुंदन खेडकर आणि केंद्रसंचालक अनिल लोखंडे उपस्थित होते.
हेही वाचा ::सीईटी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन
यासोहळ्यात सुखी कुटुंबाच्या दृष्टीने दोन किंवा एका अपत्यावर मर्यादित कुटुंब याचे महत्व सांगण्यात आले. यावेळी सत्कारमूर्तीच्या वतीने मनोगत व्यक्त करताना दर्शना दीपक पेडणेकर यांनी मुलगा, मुलगी असा भेद न करता मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. तर मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही समई असते जी सतत तेवत असते असे मनोगत व्यक्त केले. दर्शना दीपक पेडणेकर या अरमान या सामाजिक संस्थेत सोशल वर्कर म्हणून कार्यरत असून कुपोषण, गर्भधारणेत घ्यावयाची काळजी, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रियांचे आरोग्य इत्यादी अश्या अनेक विषयांवर त्या समुपदेशन करतात.