
मुंबई :
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. या कालावधीत अनेकदा विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारणासाठी प्रवेश नाकारले जातात, शिक्षकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयातील प्रतिनिधींना उद्भवणाऱ्या अडचणी व त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) मागील आठवडाभरामध्ये राज्यभरात मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी, पुणे व कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळांना महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सीईटी कक्ष थेट महाविद्यालांच्या दारात जाऊन प्राचार्य व अधिकारी यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत महाविद्यालयांचे प्रतिनिधींच्या शंकाचे निरसन व्हावे व प्रवेश सुलभरित्या होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी सीईटी कक्षाकडून १५ जुलैपासून राज्यभरात कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. रत्नागिरी येथे पहिल्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जवळपास ३०० पेक्षा जास्त शिक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये १२०० शिक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर कोल्हापूर येथे पार पडलेल्या तिसऱ्या कार्यशाळेत ७०० पेक्षा अधिक शिक्षकांनी उपस्थित दर्शवली होती. यावेळी उच्च शिक्षणातील प्रवेश प्रक्रियेबाबत उच्च शिक्षण विभागाचे विशेष कार्य अधिकारी जयंत पाटील यांनी उपस्थितांना माहिती दिली. तसेच त्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरणही केले. त्याचप्रमााणे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी एकूणच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, टप्पे, सीईटी कक्षाची स्थापना, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सीईटी परीक्षा संगणक आधारित घेणे, निकाल जाहीर करणे, महाविद्यालयांचा प्रसंतीक्रम भरणे, गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार यादी जाहीर करणे आदी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती परीक्षा समन्वयक सिद्धेश नर यांनी दिली. तसेच तंत्रशिक्षणातील अभ्यासक्रमांसंदर्भातील माहिती अधिव्याख्यात मोरेश्वर भालेराव आणि कला शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक सुचित्रा मिटकर यांनी कलाविषयक अभ्यासक्रमासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा : सीईटी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ
प्रवेश प्रक्रिया, संस्था व महाविद्यालयांची परिपूर्ण माहिती, अभ्यासक्रम कसे असणार, शैक्षणिक शुल्क, आरक्षण, एनआरआय विद्यार्थ्यांना प्रवेश कसे मिळणार आदी माहितीही यावेळी उपस्थितांना दिली. देण्यात आली. तसेच पुढील टप्प्यामध्ये अन्य विभागांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.