
डोंबिवली (शंकर जाधव) :
डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर भगवान काटेनगरमधील 209 घरांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईची टांगती तलवार लावली आहे. रेल्वे जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत 9 डिसेंबर रोजी रहिवाशांना नोटीसा बजावण्यात आल्या. या नोटीसा मिळाल्यानंतर रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. “आम्ही आमच्या जीवनभराची पुंजी घालून घर विकत घेतले, पालिकेत नियमित कर भरतो, मात्र आमची फसवणूक झाली असून आम्ही अतिक्रमण केलेले नाही,” असा आक्रोश रहिवाशांनी केला आहे.
यासंदर्भात गणेशनगर पूर्णवसन कृती समितीच्या वतीने भगवान काटेनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष शिवशंकर धबडगे, सचिव संदीप सावंत, खजिनदार सचिन कांबळे, कार्याध्यक्ष रामदास साटम, उपाध्यक्ष श्रद्धा वाढवळ, बबन बेर्डे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. या सभेत माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, रिपाइं (आठवले गट) चे माणिक उघडे हेही सहभागी झाले होते.
हेही वाचा : मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अखेर सुरु होणार
रहिवाशांनी आमदार व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या. रहिवाशांनी स्पष्ट केले की त्यांनी 2012-13 पासून विकासकाकडून पैसे भरून घरे विकत घेतली असून सर्व कागदपत्रे त्यांच्या जवळ आहेत. “आम्ही कोणतेही अतिक्रमण केलेले नाही, विकासकाकडून फसवणूक झाली आहे. सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार,” असा इशाराही त्यांनी दिला.रहिवाशांनी सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला बेघर करू नका, पूर्णवसन करा किंवा मोबदला द्या, अन्यथा आमच्या कुटुंबासह आम्ही मोर्चा काढू, असे समितीने स्पष्ट केले.