
मुंबई :
संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे बंद झालेले वेतन अखेर सुरु करण्यात आले. भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच व्हावे तसेच अतिरिक्त शिक्षकांचे थांबविण्यात आलेले वेतन तातडीने सुरु करावे, अशी मागणी शासनाकडे बोरनारे यांनी लावून धरली होती. अखेर शिक्षण उपसंचालकांनी आदेश देत मुंबई विभागातील एकूण ७९८ अतिरिक्त शिक्षकांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर प्रक्रिया सुरु असेपर्यंत यादीतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन त्यांच्या मूळ शाळेतूनच करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : सीईटी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबई बाहेर ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यात करण्यात आले होते. अनेक शिक्षकांना हे अडचणीचे होत होते. त्यामुळे त्यांनी शाळा नाकारल्या होत्या. अशा शिक्षकांचे वेतन शिक्षण विभागाने थांबवले होते. मात्र आता शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार या शिक्षकांचे वेतन सुरू होणार असून यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.