
मुंबई :
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) २०२५ परीक्षेचे यंदाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ही परीक्षा २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे.
कला संचालनालयाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र २०२४ मध्ये झालेल्या नियमानुसार ही परीक्षा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यंदा रेखाकला परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार एलिमेंटरी परीक्षा २४ व २५ सप्टेंबर रोजी आणि इंटरमिजिएट परीक्षा २६ व २७ सप्टेंबर रोजी हाेणार आहे. या परीक्षेसाठी सर्व केंद्रप्रमुखांना शासकीय रेखाकला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच केंद्राची नोंदणी किंवा माहिती ऑनलाईन अद्ययावत करण्यासाठी तसेच केंद्राच्या अधिनस्त असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी २१ ते २६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाइन पद्धतीने https://www.msbae.org.in या संकेतस्थळावर भरायची असल्यामुळे संबंधित परीक्षांना प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रप्रमुख यांनी निदर्शनास आणावे, असेदेखील स्पष्ट केले आहे.
असे आहे नोंदणीचे वेळापत्रक
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २१ ते २४ जुलैदरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तसेच १ ते २४ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २५ ते ३१ ऑगस्ट आणि अतिविलंब शुल्कासह १ ते १२ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. १२ सप्टेंबरनंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक ऑनलाइन पद्धतीने २१ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान नोंदणी करता येणार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
एलिमेंटरी परीक्षा २४ व २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी वस्तूचित्र परीक्षा सकाळी १०.३० ते १ या कालावधीत तर स्मरणचित्र परीक्षा दुपारी २ ते ४ या कालावधीत होणार आहे. तसेच २५ सप्टेंबर रोजी संकल्पचित्र (नक्षीकाम) परीक्षा ही सकाळी १०.३० ते १ तर कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन या विषयाची परीक्षा दुपारी २ ते ४ वाजताच्या दरम्यान होणार आहे. इंटरमिजिएट परीक्षा २६ व २७ सप्टेंबर रोजी हाेणार आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी सकाळी स्थिरचित्र या विषयाची सकाळी १०.३० ते १.३० तर स्मरणचित्र विषयाची दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत परीक्षा होणार आहे. तसेच २७ सप्टेंबर रोजी संकल्पचित्र-नक्षीकाम विषयाची परीक्षा सकाळी १०.३० ते १.३० तर कर्तव्यभूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन परीक्षा दुपारी २.३० ते ५.३० या कालावधीत होणार आहे.
असे आहे शुल्क
एलिमेंटरी परीक्षेसाठी प्रती विद्यार्थी १०० रुपये शुल्क, विलंब शुल्कासह ३०० रुपये आणि अतिविलंब शुल्कासह ६०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. तसेच इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रती विद्यार्थी २०० रुपये, विलंब शुल्कासह ६०० रुपये आणि अतिविलंब शुल्कासह ७०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी परीक्षेसाठी प्रती विद्यार्थी २०० रुपये शुल्क, विलंब शुल्कासह ६०० रुपये आणि अतिविलंब शुल्कासह ७०० रुपये शुल्क तसेच इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रती विद्यार्थी ४०० रुपये, विलंब शुल्कासह १२०० रुपये आणि अतिविलंब शुल्कासह ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.