शिक्षण

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरिअम

मुंबई : 

मुंबई विद्यापीठ आणि रशियामधील मॉस्को स्टेट विद्यापीठ यांच्यात विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांकरिता असलेल्या कराराअंतर्गत, इनोप्राक्तिका मॉस्को स्टेट विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाला दिलेल्या निधीतून विद्यापीठात उच्च दर्जाचे ई-कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरिअम तयार करण्यात आले आहेत. दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही सुविधा मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील शंकरराव चव्हाण शिक्षक प्रशिक्षण अकादमी इमारतीत आजपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी (आभासी पद्धतीने), रशियाचे काऊन्सुल जनरल इवान फेटिसोव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, रशियन हाऊसच्या डॉ. एलेना रेमीझोवा, विक्टर गोरेलीख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि युरेशिअन स्टडीजचे प्रा. संजय देशपांडे यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उदघाटन करण्यात आले. मॉस्को, रशिया येथील आर्ट-पॉडगोटोव्हका या स्वायत्त बिगर-व्यावसायिक संस्थेने या सुविधेच्या निर्मितीसाठी रुपये ३० लाखाचे अनुदान विद्यापीठास दिले आहे. ई-कंटेंट स्टुडिओच्या मदतीने शिक्षक प्रशिक्षणामध्ये आमुलाग्र बदल घडविणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आशय वृद्धीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

उच्च-गुणवत्तेच्या डिजिटल शैक्षणिक संसाधनांच्या निर्मितीसाठी प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे ई-कंटेंट स्डुडिओ आहे. ज्यामध्ये व्यावसायिक दर्जाच्या चित्रफीत तयार करण्यासाठी उच्च गुणवत्तायुक्त दृक श्राव्य उपकरणे, ई-सामग्री संपादन व निर्मितीसाठी प्रगत सॉफ्टवेअर व हार्डवेअर, टेलिप्राम्पटर व क्रोमा की, व्याख्यान ध्वनिमुद्रण व थेट प्रसारण आणि ई-सामग्री संचयन व व्यवस्थापनाच्या सुविधायुक्त हे प्रगत ई-कंटेट स्डुडिओ आहे. तसेच अद्ययावत सुविधायुक्त ऑडिटोरिअम सुविधाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

उदघाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांनी मुंबई विद्यापीठाने ई-लर्निंग, ऑनलाईन अभ्यासक्रम, मूक्स आणि स्वयंमसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. रशियाचे काऊन्सुल जनरल इवान फेटिसोव यांनी मुंबई विद्यापीठ आणि मॉस्को राज्य विद्यापीठाचे हे सहकार्य उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्यभूत ठरणार असल्याचे सांगितले. ई-कंटेंट स्टुडिओच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यास आणि विद्यार्थ्यांना डिजिटल युगासाठी तयार होण्यासाठी ही सुविधा महत्वपूर्ण असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र यांनी सांगितले. तसेच या अत्याधुनिक सुविधेमुळे शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण साधनांची ओळख होण्यास तथा या क्षेत्रात अधिक सक्षम करण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठासोबतची भागीदारी ही विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांकरिता महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे डॉ. एलेना रेमीझोवा यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *