
मुंबई :
मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी मोहम्मद वसीम, ऐनुल जैनुल हसन ऊर्फ रेहान आणि कृष्णमोहन शर्मा ऊर्फ निरज अशी या तीन भामट्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी प्रवेशाच्या नावाने महिलेची साडेचौदा लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार महिला धोबीतलाव परिसरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिची मुलगी नाशिक येथे मेडिकलचे शिक्षण घेत होती. नीट परीक्षेसाठी ती ऑनलाईन तयारी करत होती. याच दरम्यान तिची मोहम्मद वसीमशी ओळख झाली होती. त्याने तोदेखील मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असून त्याला रेहान आणि निरज यांनी मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. ते दोघेही तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतील असे सांगून तिची त्यांच्याशी ओळख करुन दिली होती. या दोघांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगितले होते. त्यानंतर तिने त्यांची माहिती तिच्या तक्रारदार आईला दिली होती. तिनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून मुलीच्या मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी १४ लाख ४० हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिच्या मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला एक वर्ष थांबा, पुढच्या वर्षी नक्की प्रवेश मिळेल असे सांगत होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाही.
हेही वाचा : एमबीबीएस, बीडीएस बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश नाेंदणीला सुरूवात
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार महिलेने आझाद मैदान पोलिसांत तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद वसीम, ऐनुल हसन र्ऊ रेहान आणि कृष्णमोहन शर्मा ऊर्फ निरज या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.