
मुंबई :
हल्ली तिशीतच काळात महिलांमध्ये स्त्रीबीजांचा साठी कमी होत असल्याचे पहायला मिळते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार भारतीय महिलांच्या गर्भाशयाचे वय युरोपियन महिलांच्या तुलनेत ६ वर्षे आधीच होते. याकरिता प्रजनन आरोग्याची तपासणी हा देखील नियमित आरोग्य तपासणीचाच एक भाग असावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कमी झालेला स्त्रीबीज साठा ही एक अशी स्थिती आहे जिथे स्रीबीजांची( women eggs) संख्या आणि गुणवत्ता अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने कमी होते. हे पूर्वी ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येत होते, परंतु आता तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार तरुण वयातील महिलांमध्ये ही समस्या सर्रासपणे आढळून येत आहे. त्यासाठीच यासंबंधीत लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि प्रजनन आरोग्याच्या दृष्टीने सक्रिय पावले उचलली पाहिजेत.
कमी स्त्रीबीज साठ्याचा अर्थ अंडाशयात अपेक्षेपेक्षा कमी अंडी शिल्लक राहणे होय. बहुतेक महिला गर्भधारणेच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर किंवा अनियमित मासिक पाळीच्या चक्राची समस्या घेऊन आमच्याकडे उपचाराकरिता येतात. तेव्हा आम्ही अल्ट्रासाऊंडद्वारे एएमएच (अँटी-मुलेरियन हार्मोन) सारखे स्त्रीबीज साठ्याची तपासणी करतो. तसेच अल्ट्रासाऊंडद्वारे अँट्राल फॉलिकल काउंट(अंडकोषाची संख्या) तपासतो. या सोप्या चाचण्या आम्हाला त्यांच्या स्त्रीबीजाच्या साठ्यांविषयी माहिती देतात. कमी स्त्रीबीज साठ्याची कारणं ही अनुवांशिकस्थिती किंवा कुटुंबात अकाली रजोनिवृत्ती, स्वयंप्रतिकार रोग, दीर्घकालीन तणाव, अंडाशयांच्या शस्त्रक्रियेचा वैद्यकिय इतिहास किंवा सुरु असलेले कर्करोगावरील उपचार, धूम्रपान आणि अपुरे पोषण तसेच चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, पर्यावरणीय घटक आणि विषारी पदार्थ देखील या स्थितीस कारणीभूत ठरु शकतात. आज, अनेक महिला करिअर किंवा वैयक्तिक ध्येयांमुळे गर्भधारणा पुढे ढकलण्याचा पर्याय निवडतात. परंतु त्यांना हे कळत नाही की त्यांच्या स्त्रीबीजांच्या साठ्यात अकाली घट होत आहे.वेळीच तपासणी न केल्यास, हे त्यांच्या नैसर्गिक गर्भधारणेच्या शक्यतांना मर्यादित करू शकते,असेही डॉ. रीता मोदी(वरिष्ठ वंधत्व निवारण तज्ज्ञ, मदरहुड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, खारघर) यांनी स्पष्ट केले.
डॉ. सुलभा अरोरा(क्लिनिकल डायरेक्टर,नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई) सांगतात की, कमी झालेला स्त्रीबीज साठा आता केवळ वयाशी संबंधित चिंता राहिलेली नाही, कारण तरुण महिला देखील या समस्येशी झुंजत आहेत. यासाठी सर्वच महिलांनी वेळोवेळी प्रजनन आरोग्याची तपासणी केली पाहिजे. याबाबत जागरूकता, वेळीच निदान आणि योग्य व्यवस्थापन भविष्यातील प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यात मदत करू शकते. एग फ्रिजींग आणि इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या सहाय्यक प्रजनन उपचार (ART) या समस्येचा सामना करणाऱ्या अनेक महिलांकरिता आशादायक ठरु शकतात. कमी स्त्रीबीज साठा असलेल्या महिलांनी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. उशीराने गर्भधारणा करु इच्छिणाऱ्यांसाठी एग फ्रिजींग हा पर्याय फायदेशीर ठरतो.
हेही वाचा : हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियांमागील गैरसमज दूर करा
डॉ. सुलभा अरोरा पुढे सांगतात की, संशोधनातून असे दिसून आले आहे की भारतीय महिलांच्या अंडाशयांचे वय युरोपियन देशातील महिलांच्या तुलनेत 6 वर्षे आधीच वाढते. तिशीचच्या सुरुवातीच्या आणि अगदी विशीच्या उत्तरार्धात स्त्रीबीजांची संख्या कमी असल्याचे दिसून येते जी एक चिंतेची बाब ठरत आहे. आमच्या क्लिनिकमध्ये उपचाराकरिता येणाऱ्या 10 पैकी जवळजवळ 6 रुग्णांमध्ये कमी स्त्रीबीज संख्येची समस्या आढळून येते बहुतेकदा याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. तरुणींनी वेळोवेळी त्यांची प्रजनन क्षमता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रजनन तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेऊन प्रभावी उपचार साध्य होतात.