शहर

एसटीच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत घोळ

संभ्रम निर्माण करणारी परिपत्रके काढल्याने बदल्या रखडल्या

मुंबई :

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ॲप विकसित केला असून त्याचे काम सुरू असतानाच कर्मचारीवर्ग खात्याने संभ्रभ निर्माण करणारी परिपत्रके काढून घोळ घातला आहे. बदली संदर्भात शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होत आहे. बदल्यांमधील संभ्रम तत्काळ दूर करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एसटीने ॲप विकसित केला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वर्धापन दिनी १०० बदल्या ऑनलाइन पद्धतीने करून ॲपचे उद्घाटन केले असले तरी अजूनही त्रुटी असून त्यातच कर्मचारीवर्ग खात्याने संभ्रभ निर्माण करणारी परिपत्रके काढल्याने पुन्हा बदल्या रखडल्या आहेत. याला निव्वळ कर्मचारीवर्ग खाते जबाबदार असून या सावळा गोंधळाचा कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. रस्त्यावरच्या व प्रवाशांशी संबंधित या संस्थेमध्ये हे असले वातावरण बरोबर नाही. त्यामुळे मंत्री सरनाईक यांनी यात हस्तक्षेप करावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.

एसटी महामंडळाच्या चालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक ते अधिकाऱ्यांपर्यंतच्या विनंती बदल्या आता संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विनंती बदलीचे अर्ज ॲपद्वारे विभागांतर्गत एका आगारातून दुसऱ्या आगारात, प्रदेशांअंतर्गत एका विभागातून दुसऱ्या विभागात आणि राज्यात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात असे भरून घेण्यात आले आहेत. हे होत असताना त्यात अनेक त्रुटी अजूनही दिसत असून पती पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजाराने आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्यात आल्याने शासनाच्या परिपत्रकांची व मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होत आहे. पती पत्नी एकत्रीकरण बदल्या न केल्याने अनेक कर्मचारी कौटुंबिक तणावात आहेत. त्यातच दुर्धर आजाराने आजारी असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अजून किती दिवस ॲपचे काम करीत राहणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा : तिशीतच कमी होतोय गर्भाशयातील स्त्रीबीज साठा

या शिवाय आपआपसात बदलीने महामंडळाचे कुठलेही आर्थिक नुकसान होणार नसून त्या बदल्या सुद्धा विनाकारण रखडल्या असून ज्या बदल्यांमुळे, कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही किंवा महामंडळाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही , अशा बदल्या तरी तात्काळ करण्यात याव्यात अशी मागणीही संबंधित कर्मचाऱ्यांच्या वतीने बरगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *