
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेशा परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम व विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्याक्रमाची निवड यादी ३१ जुलै रोजी तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची निवड यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नावनोंदणी प्रक्रिया १५ जुलै रोजी पूर्ण झाल्यानंतर २४ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील २५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २६ ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या फेरीची निवड यादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये जागा निश्चित करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. ४ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : कृषी अभ्यासाच्या प्रवेशाची किमान अट शिथील
दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम ५ ते ७ ऑगस्टदरम्यान भरता येणार आहे. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होऊन १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसरी फेरी १६ ते २५ ऑगस्ट आणि चौथी फेरी २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. चार फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थात्मक फेरीसाठी ४ सप्टेंबर रोजी हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर ६ ते १३ सप्टेंबरदरम्यान संस्थात्मक फेरीअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्कासह ११ सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द करण्याची मुभा असणार आहे.
विधि अभ्यासक्रमाची निवड फेरी ६ ऑगस्ट रोजी
विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची २४ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, ३० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. तर ६ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ७ ते ९ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालय जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुसरी फेरी १३ ते २० ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार असून, तिसरी फेरी २१ ते १२ सप्टेंबर आणि संस्थात्मक फेरी १३ ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
अभियांत्रिकीचे वेळापत्रक
- अभ्यासक्रमनिहाय जागांची संकेतस्थळावर यादी- २५ जुलै
- पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम – २६ ते २८ जुलै
- पहिली फेरी – ३१ जुलै
- प्रथम फेरीतील प्रवेश – १ ते ३ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत
- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी – ४ ऑगस्ट २०२५
- दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम – ५ ऑगस्ट २०२५ ७ ऑगस्ट २०२५
- दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट
- दुसऱ्या फेरीतील महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे – १२ ते १४ ऑगस्ट सायं. ५ वाजेपर्यंत
- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी – १६ ऑगस्ट
- तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम – १७ ते १९ ऑगस्ट
- तिसरी गुणवत्ता यादी – २२ ऑगस्ट २०२५
- तिसऱ्या फेरीतील महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे – २३ ते २५ ऑगस्ट सायं. ५ वाजेपर्यंत
- चौथ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी – २६ ऑगस्ट
- चौथ्या फेरीसाठी पसंतीक्रम – २८ ते ३० ऑगस्ट
- चौथी गुणवत्ता यादी – १ सप्टेंबर २०२५
- चौथ्या फेरीतील महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे – २ ते ४ सप्टेंबर सायं. ५ वाजेपर्यंत
- संस्था स्तरावरील प्रवेशासाठी अर्ज सादर करणे – २५ जुलै ते १ सप्टेंबर २०२५
- संस्थेला पात्र विद्यार्थ्यांची यादी – ४ सप्टेंबर
- संस्था स्तर प्रवेश प्रक्रिया (रिक्त जागा भरती) – ६ ते १३ सप्टेंबर
- संपूर्ण शुल्क परत मिळवून रद्द करण्याची अंतिम तारीख – ११ सप्टेंबर
- प्रवेशासाठी अंतिम तारीख – १३ सप्टेंबर २०२५ सायं. ५ वाजेपर्यंत