शिक्षण

साठये कॉलेज विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कार्यरत

मुंबई : 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, साठ्ये कॉलेजच्या (स्वायत्त), समुपदेशन कक्षाच्या वतीने मानसिक आरोग्यावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मंगळवारी पार पडलेल्या या उपक्रमात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मानसिक आरोग्याबाबतच्या संस्थेचा पुढाकार यातून अधोरेखित होतो.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) बदलत्या मागण्यांशी जुळवून घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने ही संवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रेयसी तेंडोलकर-आव्हाड आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हेम मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. त्यांनी मानसिक आरोग्याच्या महत्त्वाच्या बाबींसह तरुणांमध्ये जागरूकतेची गरज, थकवा (burnout) ओळखण्याची लक्षणे आणि अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज यावर सखोल चर्चा केली.

आपल्या दैनंदिन वेळापत्रकात विश्रांती म्हणजे स्वतःला दिलेला पुरस्कार आहे असे न समजता ती ‘गरज’ म्हणून समाविष्ट करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. आपल्या वाढीच्या काळात अस्वस्थता ही एक नैसर्गिक बाब आहे. अशावेळी मित्र, कुटुंबीय किंवा व्यावसायिक यांपैकी जिथे तुम्हाला व्यक्त व्हावेसे वाटेल तिथे व्यक्त झाले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. कार्यशाळेतील विशेष आकर्षण म्हणजे “ग्रिट स्केल” ही उपक्रमात्मक कृती होती, जिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक सक्षमतेची (resilience) ची तपासणी करता आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला, आणि त्यांच्या अभिप्रायातून सत्राची उपयुक्तता स्पष्टपणे जाणवली.

हेही वाचा : रायगड, रत्नागिरीसह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना एक चिंतनात्मक गृहपाठही देण्यात आला, ज्याच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्यविषयक सवयी आपल्या दैनंदिन जीवनात रुजवू शकतील, असा हेतू होता. पीटीव्हीए साठये कॉलेज (स्वायत्त) हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहिले आहे, आणि ही मानसिक आरोग्य कार्यशाळा त्या दृष्टीने एक संवेदनशील आणि दूरदृष्टीचा पुरावा आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्यालाही समांतर महत्त्व देत हे कॉलेज एक जबाबदार आणि विद्यार्थी-केंद्रित संस्था म्हणून आपली ओळख अधोरेखित करत आहे.नव्या शैक्षणिक रचनेत होणाऱ्या बदलांमुळे अनेक विद्यार्थी गोंधळलेले आणि तणावग्रस्त झालेले असताना अशा प्रकारच्या कार्यशाळा खूपच उपयुक्त ठरू शकतात असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *