
आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना ‘विजय दिवसाच्या’ हार्दिक ‘ शुभेच्छा! आजच्याच २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिलमध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून ‘भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय’ यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. हा भारतीयांच्या शौर्याचा अगदी अलिकडचा पराक्रम आहे.पण गेल्या ३ तीन हजार वर्षात भारतीय वीर भूमिपुत्रांनी आणि योध्यानी असाच शौर्याचा इतिहास रचला, पण तो इतिहास आजच्या पिढीपर्यंत ज्या प्रखरतेने पोहोचायला पाहिजे, त्या प्रखरतेने आतापर्यंत पोहोचला नाही, याची मला खंत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि विजय दिवसाचे औचित्य साधत माझ्या कौशल्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातल्या सर्व शासकीय आणि खाजगी मिळून एक हजार व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्रात भारतीय विजयाची गाथा विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. ऐतिहासिक लढाया, पराक्रमी राजे, योध्ये यांचे पोस्टर प्रदर्शन, त्याअनुषंगाने काव्य, निबंध स्पर्धा, माजी सैनिकांचे वीरगाथे संदर्भात व्याख्यान, वीरमाता, वीर पत्नी यांचा सन्मान आणि शहिदांना नमन या कार्यक्रमांनी भारतीय पराक्रमाला विविध संस्थांमध्ये उजाळा देण्यात येणार आहे.
भारतीय भूमिपुत्र राजे, योध्ये यांचे शौर्य
भारतीय शूरवीर पराक्रमी राजांचे शौर्य विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवून प्रखर राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्याने जागृत करावी या उद्देशाने लोणावळा येथील क्रांतिकारक लहुजी साळवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांगरगाव येथे विजय दिवसाचे पाहिले पुष्प वाहण्यात आले. भारतीय महापराक्रमी राजांनी आणि भारतमातेच्या शुर रण रागिणीनींनी परकीय आक्रमण परतवून लावताना दाखवलेल्या शौर्याची गाथा राज्यभरातल्या संस्थांमध्ये सांगितली जाणार आहे. भारतीय इतिहास साक्ष देतो की, भारतभूमीवर आलेल्या प्रत्येक परकीय आक्रमकास भारतीय धैर्याने आणि पराक्रमाने सामोरे गेले. अलेक्झांडरशी लढणारा राजा पुरू, इस्लामी आक्रमकांविरुद्ध उभे ठाकलेले महाराजा सुहेलदेव, अकबराला धूळ चारणारी राणी दुर्गावती, महाराणा प्रताप ज्यांनी मेवाडच्या प्रत्येक कणाकणात स्वातंत्र्याची शपथ रुजवली, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, आणि पृथ्वीराज चौहान ज्यांनी शत्रूंना वेळोवेळी पराभवाची धूळ चारली. दुर्दैवाने, हा इतका गौरवशाली विजयाचा इतिहास काही काळ राजकीय स्वार्थाच्या धुसर पडद्याआड लपला. या पराक्रमाचे सखोल चित्रण भारतीयांच्या पुढे आले नाही हे आपले दुर्दैव. मात्र आता हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे. नव्या पिढीला आपल्या राष्ट्राच्या शौर्यगाथांचा अभिमान बाळगता यावा, त्यांच्या नसानसांत भारतीयत्व आणि पराक्रमाची ज्योत पेटावी यासाठी विजय दिनाचा उत्सव साजरा करणे अत्यावश्यक आहे. पराक्रमी राजांनी भारताच्या दैदिप्यमान विजयगाथेत सोनेरी पाने भरली. हीच सोनेरी पाने पुन्हा एकदा ऊर्जेने ओतप्रोत भरलेल्या तरुणांसमोर उलगडली जाणार आहेत.
स्वातंत्र्यानंतरही भारताची विजयाची परंपरा
ज्याप्रमाणे आपल्या भूमिपुत्र राजांनी परकीय आक्रमणाच्या विरोधात पराक्रमाची ज्योत तेवत ठेवली त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतरही भारतीय सैन्याने शत्रू राष्ट्रांवर विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध १९४८ मध्ये पहिले युद्ध, १९६५ चे युद्ध, १९७१ चे युद्ध ज्यामध्ये बांगलादेशाची मुक्तता झाली. या प्रत्येक लढ्यात भारतीय सैन्याने प्राणांची आहुती देत भारतीयांची छाती गौरवाने फुलवली. अलीकडील पाकिस्तान पुरस्कृत उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि ‘ऑपरेशन बंधन’ सारख्या मोहिमांनी भारताची दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका जगाला दाखवून दिली. नुकतेच पहलगामच्या भ्याड हल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदुर’ ने दिलेले जशाच तसे उत्तर हा नव्या भारताचा आक्रमक पवित्रा संपूर्ण जगाने पहिला.
भारतीय संस्कृतीत विजय ही केवळ ऐतिहासिक घटना नाही, ती आपल्या जीवनमूल्यांचा, परंपरांचा आणि राष्ट्राभिमानाचा गाभा आहे. विजय दिवस हा उत्सव शौर्य, बलिदान आणि स्वराज्याची प्रेरणा देणारी ऊर्जा आहे. चला प्रखर राष्ट्रभक्तीच्या भावनेने शौर्याला मनोभावे वंदन करुया!
लेखक : मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री, महाराष्ट्र राज्य