क्रीडा

चेंबूर जिमखाना राज्य स्पर्धेत समृद्धी – झैद जेते 

मुंबई : 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बँक ऑफ बडोदा पुरस्कृत ४ थ्या चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने मुंबईच्या विकास धरायला २५-०, २५-१८ सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आणि या गटाचे विजेतेपद पटकावले.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या प्रशांत मोरेने रायगडच्या राजेश गोहिलचा १५-२५, २५-२१ व २५-१६ असा पराभव केला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी मुंबईच्या विकास धारियाने रायगडच्या राजेश गोहीलवर २५-४, १२-२०, ९-८ असा चुरशीचा विजय मिळवला होता. तर ठाण्याच्या झैद अहमदने प्रशांत मोरेवर २२-१८, २०-८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईच्या अंबिका हरिथला ३-१६, २५-५ व २५-१७ असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकावले. याच गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या ऐशा साजिद खानाने मुंबईच्या मिताली पाठकवर १६-२०, २०-१९, २५-५ असा विजय मिळवला. उपांत्य लढतीत समृद्धी घाडिगावकरने मिताली पाठकला १७-१४, १८-१० असे तर अंबिका हरिथने ऐशा साजिद खानचा २०-८, २१-४ असा पराभव केला होता.

हेही वाचा : चेंबूर जिमखाना कॅरम प्रशांत मोरे – विकास धारिया उपांत्य फेरीत दाखल 

विजेत्या खेळाडूंना बँक ऑफ बडोदा चेंबूर शाखेचे मॅनेजर शशिकांत नाईक व चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष बाळकृष्ण वधावन यांच्या हस्ते रोख पारितोषके, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आणि जिमखान्याचे कॅरम आणि बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *