
मुंबई :
राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी गुरुवार, ३१ जुलै रोजी जाहीर होणार असून, यादीपूर्वीचा शेवटचा टप्पा असलेली पसंतीक्रम भरण्याची मुदत आज, मंगळवार २९ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता संपणार आहे. अकरावीच्या चौथ्या फेरीसाठी अर्जाचा भाग दोन लॉक करण्याची ही अंतिम संधी असल्यामुळे, इच्छुक विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित फेर्यांत आतापर्यंत ८,११,७३१ विद्यार्थ्यांचा प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित झाला आहे. एकूण १४.३२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून चौथ्या फेरीसाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.
अकरावीच्या चौथ्या फेरीसाठी तीन हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
चौथ्या फेरीसाठी सोमवारी ३,१५१ नव्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ‘कॅप’ अंतर्गत २,६०,४४४ विद्यार्थ्यांनी तसेच कोटा (अल्पसंख्याक, इनहाऊस, व्यवस्थापन) अंतर्गत ९,४३० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. या चौथ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १ ते २ ऑगस्टदरम्यान आपला प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन निश्चित करावा लागेल. दरम्यान, सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आणि उच्च माध्यमिक शाळांनी ११ ऑगस्टपूर्वी वर्ग सुरू करावेत, अशा स्पष्ट सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या आहेत.