शिक्षण

अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीमध्ये १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

पहिल्या फेरीसाठी १ लाख ९९ हजार विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी

मुंबई :

राज्यातील विविध अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी गुरुवारी सायंकाळी ५ वाजात जाहीर करण्यात आली. या यादीसाठी राज्यभरातून पसंतक्रम भरलेल्या १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच पहिल्या यादीमध्ये १५ हजार ८५२ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने त्यांचा अर्ज ऑटोफ्रिज करण्यात आला आहे.

अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीचे प्रवेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी कक्ष) होणाऱ्या सीईटी परीक्षेद्वारे राबवली जाते. यंदा ही परीक्षा एप्रिल महिन्यात पार पडली. त्यानंतर जूनमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीअंतर्गत राज्यभरातून २ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित फेरीसाठी ग्राह्य धरण्यात आले. या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पसंतीक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचेच महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. त्यांनी प्रवेश न घेतल्यास ते पुढील दोन फेऱ्यांमधून बाद होऊन चौथ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

पहिल्या यादीत पसंतीक्रम लागलेल्या १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांपैकी किती जण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. तसेच दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना पहिले तीन पसंतीक्रम विचारपूर्वक भरावे लागणार आहेत. कारण दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या पहिल्या तीन पर्यायांपैकी एकाही महाविद्यालयात त्यांचे नाव लागले, तर त्यांना तिथे प्रवेश घ्यावाच लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *