शिक्षण

नियमभंग केलेल्या २ हजार १५२ विद्यार्थ्यांच्या पुन्हा होणार परीक्षा

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई :

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ च्या परीक्षेत नियमभंग केल्यामुळे निकाल राखीव ठेवलेल्या २ हजार १५२ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोढा यांनी हे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षा AI आधारित Proctored तंत्रज्ञान वापरून MCQ स्वरूपात घेण्यात आल्या. ७ जुलै २०२५ रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलै २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सत्रात ३६ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना AI सुरक्षा व Proctored प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले होते. मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, 23 ऑगस्ट 2025 रोजी पुनर्परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना ही विशेष संधी दिली जात आहे.

हेही वाचा : EDUCATION : अकरावी प्रवेशाची आता ओपन टू ऑल फेरी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सैद्धांतिक परीक्षा पारंपरिक स्वरुपात घेतल्या जात होत्या. या परीक्षांच्या निकालासाठी सुमारे २ महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा यासाठी मंडळाने अत्याधुनिक AI Proctored तंत्रज्ञान वापरून या परीक्षा MCQ स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला होता. आता पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून यासंदर्भात मंडळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच सूचना निर्गमित करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *