
यंदा मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजाराचे रुग्ण मे महिन्यापासूनच आढळू लागले होते. मात्र त्यानंतर अधूनमधून होणारा जोरदार पाऊस व त्यानंतर बराच कालावधीसाठी घेतलेली उघडीप यामुळे साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने जून व जुलैमध्ये रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. यामध्ये हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांबरोबरच चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने जूनच्या तुलनेत जुलैमध्ये लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
जूनमध्ये हिवतापाचे ८८४ रुग्ण सापडले होते. मात्र जुलैमध्ये या रुग्णांची संख्या १ हजार २९४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे जूनमध्ये डेंग्यूचे १०५ तर जुलैमध्ये ७०८ रुग्ण सापडले असून, डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सहा पट पेक्षा अधिक वाढ झाली आहे. चिकुनगुनियाचे जूनमध्ये फक्त २१ रुग्ण सापडले होते. तर जुलैमध्ये १२९ रुग्ण सापडले आहेत. तसेच अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे जूनच्या तुलनेत लेप्टोच्या रुग्णंच्या संख्येत तब्बल चार पटीने वाढ झाली आहे. जूनमध्ये लेप्टोचे ३६ रुग्ण सापडले असले तरी जुलैमध्ये १४३ रुग्ण सापडले आहेत. जूनमध्ये हिपेटायटीसचे ७८ रुग्ण सापडले होते, तर जुलैमध्ये १७६ रुग्ण सापडले आहेत.
अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत घट
मे मध्ये सुरू झालेल्या पावसामुळे मे व जूनमध्ये गढूळ पाण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबईमध्ये या दोन महिन्यांमध्ये अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. जूनमध्ये अतिसाराचे ९३६ रुग्ण सापडले होते. मात्र जुलैमध्ये अतिसाराचे ६६९ रुग्ण सापडले आहेत.
६९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण
साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहीमेंतर्गत शहरातील १४ लाख ३९ हजार ९७८ घरांचे सर्वेक्षण करत विविध ठिकाणच्या ६९ लाख ८९ हजार ९३ नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये २ लाख ३१ हजार ११२ नागरिकांचे रक्ताचे नमूने घेण्यात आले.
काय काळजी घ्याल
हिवताप, डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये, घराच्या आसपास कोठेही पाणी साचणार याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात तसेच जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर अशा अडगळीतील वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तातडीने पाण्याचा निचरा करावा. लेप्टोच्या प्रतिबंधासाठी पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येणे टाळा. गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून प्या. तसेच नागरिकांनी ताप आल्यास घराजवळीला महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी केले आहे.