
देशाच्या राजधानीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पण याचदरम्यान आज मंगळवारी (ता. 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएची महत्त्वाची बैठक घेण्यात येत आहे.[Narendra Modi] या बैठकीला एनडीएच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. कारण स्वतः मोदी या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. पण या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पण याच सत्काराच्या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींना डिवचले आहे. जर मोदींनी काही वर्षांपूर्वी शब्द दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात घेतले असते, तर आम्ही सुद्धा त्यांचा सत्कार केला असता, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 5 ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एनडीएच्या बैठकीबाबतची विचारणा करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एनडीएची बैठक यासाठी आहे कारण राहुल गांधींनी 7 तारखेला त्यांच्या निवासस्थानीची इंडि आघाडीची बैठक बोलावली आहे. त्यासाठी सर्व नेते उपस्थित होणार आहेत. आता आमच्या बैठकीमुळे बहुतेक त्यांच्या (नरेंद्र मोदी) मनामध्ये भीती निर्माण झाली असावी आणि त्यामुळे मोदींनी आज एनडीएची बैठक बोलावली. त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्या बैठकीवर परिणाम होणार नाही, असे राऊतांनी सांगितले.
तर, त्या आजच्या बैठकीत मोदींचा सत्कार होणार आहे, असंही मला कळलं, तो कशाकरता, सप्टेंबरमध्ये 75 वर्ष पूर्ण झाल्यावर मोदी रिटायर होत आहेत ? की आणखी कशाकरिता एनडीएची लोकं त्यांचा सत्कार करणार आहेत ? असे खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केले. तसेच, खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवले नसते आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात आले असते तर आम्ही सगळ्यांनीसुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींना डिवचण्याचे काम केले आहे. देशातील पंतप्रधानांनी जे सांगितले ते करून दाखवले, आता पीओक घेणार असे राजनाथ सिंग, अमित शहा, मोदी म्हणाले होते. पण आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही याबद्दल आम्हाला दु:ख आहे अशी खोचक टीकाही राऊतांनी केली.