
मुंबई :
गुंतवणुकीसह कर्जाच्या आमिषाने एका वयोवृद्ध व्यावसायिकाची 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी त्यांचयावरील आरोपांचे खंडन केले आहे.
तक्रारदार वयोवृद्ध एका खाजगी फायनान्स कंपनीचे संचालक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची राजेश आर्या या व्यक्तीमार्फत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी बेस्ट डिल या गृहखरेदी आणि ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मचे संचालक असल्याचे सांगून त्यांच्याकडे 75 कोटीच्या कर्जाची मागणी केली होती. नंतर त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते. या गुंंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कर्ज स्वरुपात गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने त्यांनी त्यांच्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे एप्रिल 2015 रोजी त्यांनी शेअर सबस्क्रिशन करारातंर्गत 39 कोटी 90 लाख रुपये आणि सप्टेंबर 2015 रोजी 25 कोटी 83 लाख अशी 60 कोटी 48 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंंतवणुकीवर त्यांना मासिक कर्जाचा परतावा आणि व्याजाची रक्कम देण्याबाबत ठराव करण्यात आला होता.
याच दरम्यान सप्टेंबर 2016 रोजी शिल्पा शेट्टी हिने कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2017 रोजी राज कुंद्राने दुसर्या करारात चूक केल्याने कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे कंपनीवर दिवाळखोरीची कारवाई सुरु करण्यात आली होती. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने कर्ज स्वरुपात त्यांच्याकडून 60 कोटी 48 लाख रुपये घेतले होते, मात्र या पैशांचा व्यवसायात वापर न करता वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना व्याजासह मुद्दल रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली.
हेही वाचा : डबेवाला बांधवांना मिळणार २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिसांत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्यांचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत शिल्पा, राजसह इतर काही आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.