
मुंबई :
गणेशोत्सवापूर्वी राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतरांचे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन देण्याची मागणी भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत बोरनारे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून हा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
२६ ऑगस्ट रोजी हरतालिका असून त्याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरामध्ये विशेषतः मुंबई व कोकणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी तसेच कोकणात मोठ्या संख्येने जात असतात.
हेही वाचा : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यापूर्वी अनेकदा शासनाने गणेशोत्सवापूर्वी वेतन दिलेले आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवापूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतरांना ऑगस्ट पेड सप्टेंबर चे वेतन गणेशोत्सवापूर्वी दिले तर शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांना हा सण उत्साहाने साजरा करता येईल. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्यात यावे अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.