
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव जिल्हा फेरी झोन २ मध्ये वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल आर्ट्स महाविद्यालयाने भव्य विजय मिळवला. या महोत्सवात १३ विविध स्पर्धात्मक प्रकारांपैकी ५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावून महाविद्यालयाचा झेंडा उंचावला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५–२६मध्ये मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या युवा महोत्सवात एकूण २५ महाविद्यालयांमधून सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यामध्ये १३ विविध स्पर्धात्मक प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल आर्ट्स कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी एकूण ५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावून महाविद्यालयाचा झेंडा उंचावला आहे. यामध्ये साहित्य कथाकथन प्रकारात वंशिका शुक्ला हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ऑन-द-स्पॉट पेंटिंग प्रकारात सागर जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला.पोस्टर मेकिंग स्पर्धेत निहारिका तन्ना हिने प्रथम क्रमांक पटकावला. कार्टूनिंग प्रकारात अक्षत त्रिपाठी याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच क्ले मॉडेलिंग प्रकारात अथर्व सावडकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामागे विद्यार्थ्यांची निष्ठा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठबळाचा मोलाचा वाटा आहे.