आरोग्य

टाटा रुग्णालयात दोन वर्षांत ५०० कर्करुग्णांवर यशस्वी प्रोटॉन उपचार

ॲक्ट्रक्टमध्ये १५ ऑगस्ट २०२३ मध्ये पहिल्या रुग्णावर झाले होते उपचार

मुंबई :

कर्करोग रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी टाटा रुग्णालयाच्या खारघरमधील ॲक्ट्रॅक येथे सुरू करण्यात आलेल्या प्रोटॉन उपचार केंद्रामध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्या रुग्णावर उपचार केले. त्यानंतर मागील दोन वर्षांमध्ये तब्बल ५४१ कर्करोग रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याने हे केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण सर्वसामान्य असून, त्यातील २७ टक्के रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ मे २०२३ रोजी ॲक्ट्रॅक्टमधील प्रोटॉन उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मात्र त्यानंतर केंद्रातील काही महत्त्वाच्या प्रक्रिया व रुग्णाची निवड करून उपचार सुरू करण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडला. १५ ऑगस्ट २०२३ रोजी या केंद्रामध्ये पहिल्या रुग्णावर उपचार करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ५४१ रुग्णांवर या पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षामध्ये या केंद्रामध्ये अवघ्या १४७ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या उपचार पद्धतीअंतर्गत उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यातील २७ टक्के म्हणजे १३६ रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत. या उपचारासाठीचा खर्च रुग्णालयाचा ‘रुग्ण कल्याण निधी’ किंवा कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व या उपक्रमांद्वारे उभारलेल्या निधीतून करण्यात आला आहे.

हेही वाचा : शिल्पा शेट्टी व राज कुंद्राने व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रोटॉन उपचार केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना कमीत कमी दुष्परिणामांसह जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून कसून तपासणी केली जाते. या केंद्रात लहान मुलांना भूल देण्याची सुविधा देखील आहे. उपचार घेणाऱ्या मुलांसाठी खास खेळण्याची जागा आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘प्रेरक’ स्वयंसेवी रुग्ण समर्थन गट तयार करण्यात आला आहे. यामुळे रुग्णांमध्ये परस्पर समर्थन, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ होते. बहुतेक रुग्णांना ॲक्ट्रॅक्टमध्ये नाममात्र शुल्कात राहण्याची व्यवस्था केली जाते.

उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण

उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्णांमध्ये मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये (सीएनएस) ट्यूमर होता. त्याखालोखाल हाडांच्या ट्यूमर असलेल्या रुग्णांची संख्या २३ टक्के, डोके आणि मान ट्यूमर असलेल्या रुग्णांची संख्या १९ टक्के, लहान मुलांमध्ये ट्युमर असलेल्या रुग्णांची संख्या १६ टक्के इतकी आहे. त्याचबरोबर स्त्रीरोग, स्तन कर्करोग, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर असलेल्या रुग्णांवरही उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती टाटा रुग्णालयातील प्रॉटोन उपचार केंद्राचे प्रमुख व शैक्षणिक उपसंचालक डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी दिली.

पश्चिम भारतातील रुग्णांना सर्वाधिक लाभ

प्रोटॉन उपचार पद्धतीचा लाभ देशातील सर्व भागातील रुग्णांना होत आहे. यामध्ये भारताच्या पश्चिमेकडील राज्यातील रुग्णांचे प्रमाण ५२ टक्के आहे. पूर्वेकडील राज्यांमधील रुग्णांचे प्रमाण २३ टक्के आहे. उत्तर भारतातील रुग्णांचे प्रमाण १४ टक्के, दक्षिण भारतातील रुग्णांचे प्रमाण ६ टक्के आणि मध्य भारतातील जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे. भारताप्रमाणेच परदेशातील रुग्णांनीही या सुविधेचा लाभ घेतला आहे. परदेशातील रुग्णांचे उपचार घेण्याचे प्रमाण एक टक्का इतका आहे.

अधिक चांगल्या प्रकारे वापरासाठी संशोधनावर भर

प्रौढ आणि मुलांमध्ये प्रोटॉन उपचार पद्धतीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी व वैज्ञानिक पुरावे तयार करण्यासाठी टाटा रुग्णालयाने संशोधन प्रकल्प हाती घेतले आहेत. टाटा मेमोरियल सेंटर, भाभा अणू संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान आणि जीवशास्त्राचे मूल्यांकन करणारे संशोधन सुरू आहे. भविष्यात अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर उपायांच्या विकासाशी संबंधित संशोधन उपक्रम हाती घेण्याची योजना असल्याचे ॲक्ट्रॅक्टचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.

कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

जगामध्ये प्रोटॉन उपचार पद्धतीसंदर्भातील उपकरणे बनविण्यात आघाडीवर असलेल्या आयबीए (आयन बीम ॲप्लिकेशन्स) बेल्जियमच्या सहकार्याने टाटा रुग्णालयाला हे उपचार सुरू करणे शक्य झाले. टाटा रुग्णालय आणि आयबीए यांनी संयुक्तपणे प्रोटॉन उपचार पद्धतीमध्ये कौशल्य वाढवणाऱ्या चिकित्सक, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांसाठी एक व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

अ‍ॅक्ट्रेक येथील प्रोटॉन उपचार केंद्र हे रुग्णालयातील सर्व गरजू रुग्णांना मोफत व अत्याधुनिक कर्करोग उपचार पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– डॉ. सुदीप गुप्ता, संचालक, टाटा रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *