
मुंबई :
राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष करून मुंबई आणि ठाणे येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र हा जल्लोष सुरू असताना शहरातील विविध भागात काही गोविंदा थरावरून कोसळल्यामुळे जखमी झाले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत एकूण ७५ गोविंदा जखमी झाले होते, त्यामध्ये दोन गोविंदाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मानखुर्द येथे बाल गोविंदांसाठी दहीहंडी उभारण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात बाल गाेविंदांसाठी दुपारी ३ च्या सुमारास दहीहंडी बांधत असताना जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) याचा पहिल्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर जगमोहनला त्याच्या नेतावाईकांनी तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना थरावरून पडल्याने ७५ जण जखमी झाले आहेत. यातील ४३ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर विविध रुग्णालयांमध्ये ३२ गोविंदांवर उपचार सुरू असून, त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई शहरामध्ये ४८ जण जखमी झाले असून, त्यापैकी २७ जणांवर उपचार सुरू असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जी.टी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर २१ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आलेत. तसेच पूर्व उपनगरामध्ये १७ जण जखमी झाले आहेत त्यातील चौघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरामध्ये १० जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून, नऊ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, थरावरून कोसळून जखमी झालेल्या गोविंदाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा
जी टी रुग्णालयात अक्षय बंडल या २८ वर्षाच्या गोविंदाला उपचारासाठी अतितात्काळ दाखल करण्यात आले होते. त्याच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता. तर श्रेयस चाळके ( २३ ) या गोविंदाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या छातीत धडधड मोठ्या प्रमाणे वाढल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र प्राथामिक उपचार घेऊन तो निघून गेला.
मालाडमध्ये ९ वर्षाचा बालगोपाल जखमी
मालाडमध्ये एका चाळीमध्ये उभारण्यात आलेली दहीहंडी फोडताना थरावरून खाली पडून नऊ वर्षाचा बालगोपाल जखमी झाला आहे. त्याला कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. मुंबईमध्ये दहीहंडी फोडताना दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास ३० जण जखमी झाले असताना सायंकाळी ५.३० वाजता मालाडमधील कुरार गावातील तानाजी नगर या चाळीमध्ये बालगोपालांसाठी दहीहंडी उभारली होती. ही दहीहंडी फाेडताना आर्यन यादव (९) हा बालगोविंदा थरावरून खाली पडून जखमी झाला. त्याला तातडीने कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरकडून सांगण्यात आली.