
मुंबई :
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शासनाच्या दिनांक २ मे २०२५ च्या पत्रान्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक १६ जुलै २०२५ रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. या परीक्षेस एकूण २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परोक्षस एकूण २,११,३०८ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बी.एड. परीक्षेचे १५ हजार ७५६ ॲपिअर व डी.एल.एड. परीक्षेचे १ हजार ३४२ ॲपिअर असे एकूण १७ हजार ९८ उमेदवारांनी ॲपिअर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. तरी १४ ऑगस्ट २०२५ अखेर बी.एड. परीक्षेचे ९ हजार ९५२ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे एकूण १० हजार ७७९ ॲपिअर उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. अशा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.
सहा हजार विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
तथापि ज्या विद्यार्थी/ उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा उर्वरित बी.एड. परीक्षेचे ५ हजार ८०४ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५ अशा एकूण ६,३१९ ॲपिअर विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्त्याची रक्कम एक हजार कोटींवर
तरी विद्यार्थ्यांनी/ उमेदवारांनी अद्यापपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025 InfoAppear.aspx या लिंकमध्ये विहित मुदतीत माहिती सादर केली नाही, अशा विद्यार्थी/ उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी/ उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.