
मुंबई : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार १८ ऑगस्ट २०२५रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडेल.
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली असून उद्या 18 ऑगस्टला ती मुंबईत दाखल होईल. विमानतळ प्राधिकरणाकडून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार सकाळी 10 वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन बाईक रॅली काढून, चित्ररथावर विराजमान करुन ही तलवार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे नेण्यात येईल. दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्य विभाग,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय सांस्कृतिक कार्य संचालनालय,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे “सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन” सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगर पालक मंत्री ॲड.आशिष शेलार, श्रीमंत राजे रघूजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांच्यासह खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा (TAIT) निकाल १८ ऑगस्टला
१८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि सांस्कृतिक संचनालयाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या तलवारीचे प्रदर्शन
श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या इंग्लंडमधून आलेल्या तलवारीचे व बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट २०२५, सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथील कला दालनात सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.