
मुंबई :
नवसाला पावणारा विश्वाचा राजा अशी ओळख असलेला जीएसबी सेवा मंडळाने यंदा तब्बल ४७४ कोटी ४६ लाखांचा विमा काढला आहे. गणेशोत्सवामध्ये सर्वाधिक विमा या मंडळाकडून काढण्यात येत असून, दरवर्षी यामध्ये वाढ करण्यात येते.
गणरायाचे २७ जुलै रोजी आगमन होत आहे. यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. गणरायाचे भव्यदिव्य आगमन सोहळे होत असताना आता किंग्ज सर्कलच्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या गणरायाच्या मूर्तीसह मंडप, देखावा, गणरायाचे दागिने, कार्यकर्ते आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा तब्बल ४७४ कोटी ४६ लाखांचा विमा काढण्याची तयारी केली आहे. यामध्ये सोने व चांदीच्या दागिन्यांचा ६७ कोटींचा विमा काढण्यात आला आहे. तसेच मंडळाचे कार्यकर्ते, पुजारी, आचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा तब्बल ३७५ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर आग प्रतिबंधक व भूकंप सारख्या आपत्तीमध्ये हाेणारे नुकसान टाळण्यासाठी २ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणारे मंडप आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ३० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. गणरायाचा मंडप व आसपासच्या परिसरातील आग प्रतिबंधक मानके आणि अन्य महत्त्वाच्या बाबींच्या सुरक्षेसाठी ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती जीएसबी गणेशोत्सव मंडळाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याने यंदा विम्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच गणरायाच्या मूर्तीचे, पुजारी आणि कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश केला आहे.– अमित पै, अध्यक्ष, जीएसबी सेवा मंडळ, किंग्ज सर्कल