
मुंबई :
गेले दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. लोकलच्या एकामागोमाग रांगा लागल्याने लोकलमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले. सायंकाळी पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सुरू झाल्या. मात्र मध्य रेल्वेची मुख्य मार्गावरील सेवा सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत बंद असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मेगाहाल झाले. चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान बंद पडली. तांत्रिक कारणामुळे ही सेवा खंडित झाली. यामध्ये सुमारे अर्धा तास लोक अडकून पडले होते.
मुसळधार पावसामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. महामुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाल्याने याचा फटका रस्ते, रेल्वे वाहतुकीला बसला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने तिन्ही मार्गांवरील लोकलचे वेळापत्रक बिघडले. लोकल अर्धा ते एक तास विलंबाने धावत असल्याने लोकलमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले.
या प्रवाशांना रेल्वे आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध रेल्वे स्थानकात पाणी, बिस्कीट वाटप करण्यात आले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य, हार्बर लोकल ठप्प झाली. या पाठोपाठ वसई ते विरार स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. लोकल रेल्वे स्थानकापर्यँत जाऊ न शकल्याने अनेक प्रवासी तासनतास लोकलमध्ये अडकले.
ठाणेकडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या. रेल्वे सेवा सुरळरीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात येतील, अशी माहिती रेल्वेने ट्विटरवर पोस्ट केली. सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे फलाटावर प्रवाशांची अलोट गर्दी झाली. लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांनी रेल्वे मार्गातून पाण्यामधून चालत जवळचे रेल्वे स्थानक गाठले. पावसाचा फटका लोकल सेवे बरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला. मध्य रेल्वेने १६ गाड्या रद्द केल्या. त्यामध्ये पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. तर मुंबईकडे येणाऱ्या गाड्या पुणे, पनवेल स्थानकात रद्द करण्यात आल्या. या प्रवाशांचेही मोठे हाल झाले.
हेही वाचा : गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सेवा सायंकाळी सुरू झाली. कुर्ला ते कसारा दरम्यान पहिली लोकल ६ वाजता सुरू करण्यात आली. तर ठाणे ते सीएसएमटी लोकल ठप्प होती. पश्चिम रेल्वे सुरू झाली तरी या मार्गावरील लोकल सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
मोनोमध्ये अडकले प्रवासी
चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान बंद पडली. तांत्रिक कारणामुळे ही सेवा खंडित झाली. यामध्ये सुमारे अर्धा तास लोक अडकून पडले होते. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले. काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल.