
मुंबई :
जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये एप्रिल २०२५ मध्ये पहिली यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर अवघ्या ८३ दिवसांमध्ये जे.जे. रुग्णालयाने रोबोटिक शस्त्रक्रियेचे शतक पूर्ण केले. यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या भारतातील सार्वजनिक संस्थांमध्ये कमी कालावधीत १०१ शस्त्रक्रियांचा टप्पा गाठण्यामध्ये जे.जे. रुग्णालय पहिल्या स्थानावर पोहचले आहे. हा प्रवास केवळ जेजे रुग्णालयासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयामध्ये ९ एप्रिल २०२५ रोजी प्रथम रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही लहान चिरांद्वारे, कमी रक्तस्रावाने करणे सहज सोपे झाले तसेच या शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण जलद गतीने बरे होत आहेत. रोबोटिक शस्त्रक्रिया ही उच्च अचूकता, ३डी वाढविलेला प्रतिमा दृष्टीकोन आणि शल्यचिकित्सकांना अधिक लवचिक हालचाल देणारे तंत्रज्ञान असल्याने मागील ८३ दिवसांमध्ये जेजे रुग्णालयाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया तुकडीने पित्ताशय, हर्निया, तसेच गुंतागुंतीच्या जठरांत्र व कर्करोग शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. रोबोटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या तुकडीमध्ये डॉ. भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. चंद्रकांत साबळे, डॉ. काशिफ अन्सारी व डॉ. सुप्रिया भोंडवे यांचा समावेश आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या या रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे हजारो रुग्णांना याचा लाभ मिळत आहे.
सर्वसामान्यांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया वरदान
रोबोटिक शस्त्रक्रिया ही विनामूल्य करण्यात येत असल्याने ही शस्त्रक्रिया सर्वसामान्यांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांच्या आवाक्यात आली आहे. तसेच रुग्णांवर महागड्या वैद्यकीय देयकांचा बोजा न पडता त्यांना जागतिक दर्जाची सुविधा मिळत असल्याची माहिती डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
भावी शल्यचिकित्सकांसाठी प्रशिक्षण योजना
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १५० दिवसांच्या विकसित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अवघ्या ८३ दिवसांत १०१ रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर या कार्यक्रमाचा विस्तार करत अधिक विशेषज्ञ शाखांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आह. भावी पिढीतील शल्यचिकित्सकांना रोबोटिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे.
शस्त्रक्रियांचे महत्त्वाचे टप्पे
जे.जे. रुग्णालयामध्ये पहिली शस्त्रक्रिया ९ एप्रिल २०२५ रोजी ३७ वर्षीय विकास गोसावी यांच्या उजव्या बाजूच्या हर्नियासाठी करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्याचप्रमाणे लोअर परळ येथील ५१ वर्षीय स्मिता तिवारी यांना ‘पोर्सिलेन गॉलब्लेंडर’ हा दुर्मिळ व संभाव्य कर्करोगजन्य आजार झाला होता. त्यांच्यावर रोबोटिक पद्धतीने चिकटलेले ऊतक अत्यंत अचूकपणे वेगळे करून सुरक्षित आणि कमीतकमी आघाताची शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा : गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या
कटिबद्धता, कौशल्य आणि दूरदृष्टी यांच्या बळावर सरकारी संस्थाही अत्याधुनिक रुग्णसेवा सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवू शकतात हे यातून सिद्ध झाले आहे. तसेच हे यश केवळ आकड्यांबाबत नाही तर रुग्णसेवेचे रूपांतर करण्याबाबत आहे.
– डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे.जे.रुग्णालय