
मुंबई :
मागील चार दिवसांपासून मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. या पाण्याचा अनेकांना जावे लागले आहे. या साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्तींच्या शरीरावर जखम किंवा खरचटलेल्या भागाचा या पाण्याशी संपर्क झाल्यास त्यांना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पाण्यातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधीत पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याशा जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालये येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी-मार्गदर्शन व आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय काळजी घ्याल
पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधासाठी पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.
पावसाळी आजार प्रतिबंधाच्या अनुषंगाने आयुक्तांची आढावा बैठक
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आढावा बैठकीचे प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान लेप्टोस्पायरीसिस सह डेंग्यू, मलेरिया यासारख्या पावसाळी आजारांच्या प्रतिबंधाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळी आजारांच्या प्रतिबंधाची गरज लक्षात घेऊन आवश्यक ती जाणीव जागृती करावी, तसेच वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यासह विविध स्तरीय उपाययोजना राबवाव्यात. तसेच पावसाचे पाणी साचून डास उत्पती होणार नाही, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यासह शून्य डास मोहीम राबवावी असेही आदेश बैठकीदरम्यान दिले.