
मुंबई :
‘फकिरीयत’ हा आगामी हिंदी चित्रपट विविध वैशिष्ट्यांनी सजलेला आहे. आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची प्रचिती देणाऱ्या गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर हा चित्रपट आधारलेला आहे. या हिंदी चित्रपटाच्या रूपात महावतार बाबाजी, श्री रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, बाबा श्री कालभैरव, बाबा श्री भद्रबाहू, हेडाखान बाबा, माँ काली यांचे दर्शन आणि यासोबतच गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांचा त्यांच्या गुरु कार्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. २०२४ मध्ये गुरुमाईंना हा चित्रपट बनवण्याचा आदेश मिळाला होता. चित्रपट निर्मितीचा अनुभव नसतानाही मोठ्या धाडसाने आणि प्रचंड मेहनतीने विविध संकटांवर मात करत साधकांच्या सहकार्याने गुरुमाईंनी ‘फकिरीयत’ बनवला आहे. १९ सप्टेंबर रोजी ‘फकिरीयत’ संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे.
‘फकिरीयत’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल तसेच अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याखेरीज ‘फकिरीयत’मधील कलाकार-तंत्रज्ञ आणि चित्रपटक्षेत्रातील इतर मान्यवर मंडळीनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली ‘फकिरीयत’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. ‘फकिरीयत’ची पटकथा अनिल पवार यांनी लिहीली असून, अनुजा जानवलेकर यांच्यासोबत पवार यांनी संवादही लिहिले आहेत.
‘फकिरीयत’चा ट्रेलर उत्कंठावर्धक असून, या चित्रपटात प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळे आणि मानवहीताचे सांगण्यात आल्याचे दर्शवणारा आहे. क्रियायोग एक दैवी वरदान आहे हा सुदृढ आरोग्याच मंत्र या चित्रपटाद्वारे संपूर्ण जगाला देण्यात येणार आहे. मुद्रायोग आणि प्राणायाम यांच्या साखळीला क्रियायोग म्हणतात. ही सगळी माहिती ‘फकीरीयत’ ट्रेलरच्या सुरुवातीला देण्यात आली आहे. दीपा परबने यात साकारलेल्या गुरूमाता क्रिया योग आणि प्राणायामाबाबत जनजागृती करताना दिसतात. याखेरीज या चित्रपटात गुरु परंपरेचा महिमाही पाहायला मिळणार आहे. सद्गगुरुंचा आशीर्वाद आणि कर्म यांचा संगम या चित्रपटात घडविण्यात आल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. मनमोहक निसर्गरम्य स्थळांवर चित्रीत करण्यात आलेला ट्रेलर लक्ष वेधणारा आहे. चेहऱ्यावर सात्विक भाव असलेल्या भगव्या वस्त्रांमधील दीपा परब खऱ्या अर्थाने बाबाजींच्या शिष्येच्या रूपात त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवणार आहे. संतविचारांना सुमधूर संगीताची सुरेल जोड देण्यात आली आहे. विविध प्रसंगांच्या माध्यमातून जीवनाचा खरा अर्थ सांगण्यात आला आहे. एक निष्ठावान शिष्या आणि सक्षम गुरुची गोष्ट ‘फकिरीयत’मध्ये पाहायला मिळणार आहे.
गुरूमाई रुद्रात्मिका यांना या कलाकृतीच्या माध्यमातून सांगायचे आहे की बाबाजी आणि या चित्रपटात दाखवलेले सर्व महात्मा इतके सक्षम आणि सर्वशक्तिमान आहेत की त्यांच्या इच्छेशिवाय आपण त्यांच्या नावाने काहीही करू शकत नाही. या चित्रपटाचे आदेश त्यांच्याकडून मिळाले होते आणि म्हणूनच हे सर्व शक्य झाले. बाबा भद्रबाहू आणि बाबाजींनी सांगितलेल्या गोष्टी या चित्रपटात संवादांच्या स्वरूपात दाखवल्या आहेत. ‘फकिरीयत’ हे नाव देखील त्यांच्याच आदेशावरून देण्यात आले आहे. हे सर्व संत आणि महात्मे जात, धर्म, देव, देश याच्या पलीकडे आहेत. आपण भाषा आणि पोशाख यांना धर्म समजतो, पण फकीरियत ही एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती ज्ञान, महानता, त्याग दर्शवते. सर्व ज्ञान आणि दैवी शक्ती असूनही, या महान आत्म्यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. हीच फकीरियत आहे. हीच त्यागाची वृत्ती आहे. हीच या महान आत्म्यांची महानता आहे. या चित्रपटाचे काही चित्रीकरण काशी मणिकर्णिका आणि उत्तराखंड येथे करण्यात आले. कुंभमेळा सुरू असताना मणिकर्णिका येथे चित्रीकरण करणे खूप कठीण होते, परंतु बाबाजींच्या कृपेने ते शक्य झाले. त्यानंतर हा चित्रपट उत्तराखंडमधील अशा ठिकाणी चित्रित करण्यात आला जिथे यापूर्वी कधीही चित्रीकरण झाले नव्हते.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ
‘फकिरीयत’मध्ये उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनीषा सबनीस आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याखेरीज अभिनेता संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल या गायकांच्या आवाजात संगीतकार प्रवीण कुंवर यांनी गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. संकलन निलेश गावंड यांनी केले असून, डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.