
ठाणे :
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत जागेत लोखंडी टाक्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाडा बंदरावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन होते. त्यात दिड दिवसाचे एक हजार, पाच दिवसाचे सुमारे दोन हजारांच्या आसपास, सात दिवसांचे सुमारे शंभर एक आणि अनंत चतुर्दशीला साधारणतः पाचशेपेक्षा जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जना दरम्यान दिड दिवस आणि गौरी गणपतीला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होते. आता अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे हि गर्दी, वाहतूक कशी नियंत्रित करणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाला केला आहे.
स्थानिक प्रभाग क्रमांक २० चे महाराष्ट्र निर्माण सेनेचे शाखाध्यक्ष विनायक बिटला म्हणाले, अष्टविनायक चौकातील कृत्रिम तलावामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे.अष्टविनाक चौकात येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर विसर्जनाच्या मिरवणुका आल्यावर या चौकाच्या पुढे राहणाऱ्या सावरकर नगर, स्वामी समर्थ मठाऊकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतीमधील नागरिकांना आपली वाहने आणणे खूपच तापदायक ठरणारे आहे. एखादी आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्याठिकाणाहून मार्ग काढणे खूपच जिकरीचे ठरणार आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनंत कोळी म्हणाले, गणेश विसर्जनाच्या बहुतांशी मिरवणुका सवाद्य असतात. या मिरवणुका साधरणतः शंभर मीटर अंतरावर थांबवल्या जातात. त्यामुळे विसर्जनचीच दिवशी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ध्वनी प्रदूषण,वाहतूक कोंडीमुले स्थानिक नागरिक आणि पोलीस, पालिका प्रशासन यांच्याशी वादविवाद होऊन त्याठिकाणी नागरिकांचा उद्रेक निर्माण होऊ शकतो. याशिवाय गौरी गणपती विसर्जनादरम्यान गौरीचे मुख समुद्र किंवा खाडीतील पाण्याला दाखवण्याची प्राचीन परंपरा आहे. अष्टविनायक चौकातील या कृत्रिम तलावामुळे कोळी समाजाची हि पूर्वंपार चालत आलेली प्रथा मोडली जाणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने चेंदणी कोळीवाडा बंदरावर कृत्रिम विसर्जनासाठी मोठ्या टाक्या उपलब्ध केल्यास सर्वच समस्यांचे निवारण होणार आहे