
मुंबई :
यंदाच्या गणेशोत्सवात परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटल आणि लालबागचा राजा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाची विशेष चळवळ हाती घेण्यात आली आहे. अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात एक विशेष स्टॉल उभारण्यात आला असून, लाखो भाविकांना अवयवदानाबद्दल जाणुन घेण्याची, नोंदणी करण्याची आणि प्रतिज्ञा घेण्याची संधी याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अवयवदान हे एक सर्वोत्तम दान आहे जे एखाद्याचा अमूल्य जीव वाचवू शकते. झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) च्या २०२५ च्या आकडेवारीनुसार, दात्यांची संख्या २७ इतकी होती. या अवयव दानातून ४० रुग्णांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण केले, २६ रुग्णांनी यकृत प्रत्यारोपण केले १० रुग्णांनी हृदय प्रत्यारोपण केले, २ रुग्णांनी फुफ्फुस प्रत्यारोपण केले, २ रुग्णांनी स्वादुपिंड प्रत्यारोपण केले, २ रुग्णांनी लहान आतड्याचे प्रत्यारोपण केले आणि एकाने हात प्रत्यारोपण केले. १० जुलै २०२५ पर्यंत एकूण अवयव प्रत्यारोपणाची आकडेवारी ही ८३ इतकी होती. आकडेवारीवरून असेही दिसून आले की १९९७ मध्ये दात्यांची संख्या केवळ इतकी ४ होती. २०१९ मध्ये ही संख्या ७९ पर्यंत वाढली असून २०२४ मध्ये ही संख्या ६० वर पोहोचली आणि जुलै २०२५ ती २७ पर्यंत पोहोचली आहे. १९९७ ते २०२५ पर्यंत एकूण १,१८५ मूत्रपिंड प्रत्यारोपण, ५७९ यकृत प्रत्यारोपण, ५ मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण, २६६ हृदय प्रत्यारोपण, ५५ फुफ्फुस प्रत्यारोपण, ५ हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण, १ हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपण, २ हृदय व यकृत प्रत्यारोपण, १४ मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपण, १ स्वादुपिंड प्रत्यारोपण, ११ लहान आतड्याचे प्रत्यारोपण आणि १५ हात प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. (लिंक: https://www.ztccmumbai.org/data1.html )
लालबागचा राजा मंडळ करणार अवयवदानाचे आवाहन
भारतात प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण आणि उपलब्ध दात्यांमध्ये मोठी तफावत आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदानाबाबत संकोच बाळगल्याने प्रमुख अडथळे येत आहेत. मुंबईतील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेल्या या गणेशोत्सवात भक्तांना प्रेरणा देऊन ही दरी भरून काढणे हे या मागचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ग्लेनईगल्स हॉस्पिटल आणि लालबागचा राजा मंडळ हे आपल्या भक्तांन अवयवदानाची प्रतिज्ञा करून अवयवदानाचे आवाहन करणार आहे.
हेही वाचा : लालबागच्या राजाचा दरबाराची उंची यंदा ५० फुट पर्यंत
ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबईचे सीईओ डॉ. बिपिन चेवले सांगतात की, अवयवदान हे सर्वात मोठे दान आहे. ज्याप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या भाविकांच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात, त्याचप्रमाणे अवयवदानामुळे अवयव निकामी होणाऱ्या रुग्णांसाठी आयुष्यातील मोठा अडथळा दूर करण्याचे काम आपण करु शकतो व एखादयाला जगण्याची दुसरी संधी देऊ शकतो.
लाखो भक्त येथे याठिकाणी प्रार्थनेसाठी येतात. या उपक्रमाद्वारे भाविकांना अवयवदानाबाबत जागरूक करून मृत्यूशी झुंजणाऱ्या रुग्णांना नवे आयुष्य मिळवून देण्याचा निस्वार्थ प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेला आमचा पूर्णपणे पाठिंबा असून नागरिकांनी अवयवदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे अशी आशा आहे.
– सुधीर साळवी, विश्वस्त, लालबागचा राजा मंडळ