
मुंबई :
म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या कोकण मंडळाने घर आणि भूखंड विक्रीस दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार अर्जदारांना १२ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची लॉटरी ९ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली घरे, आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणारी घरे) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशी एकूण ५ हजार २८५ घरे विक्रीस उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या लॉटरीचे अर्ज भरण्यास १५ जुलै रोजी प्रारंभ झाला. लॉटरी अर्जदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने मंडळातर्फे पहिल्यांदा २८ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर पुन्हा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार लॉटरीसाठी १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. तर १३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. तसेच १५ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.
म्हाडाची प्रारूप यादी २२ सप्टेंबर
लॉटरीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. लॉटरीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तर ९ ऑक्टोबर रोजी लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.लॉटरीसाठी अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ – ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. लॉटरीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
लॉटरीसाठी १ लाख १६ हजार ५८३ अर्ज प्राप्त
लॉटरीसाठी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत १ लाख ४९ हजार ९४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर अनामत रकमेसह १ लाख १६ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. लॉटरीला मुदतवाढ देण्यात आल्याने अर्जांची संख्या आणखी वाढणार आहे.