आरोग्य

गणेशोत्सवादरम्यान एफडीएकडून २१८ किलोचे बनावट पनीर जप्त

मुंबई :

सण व उत्सवादरम्यान मिठाई, खवा, पनीर यासारख्या पदार्थांना प्रचंड मागणी वाढते. त्यामुळे यामध्ये भेसळ होऊन नागरिकांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मिळण्याची शक्यता असते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम राबवत २५ ऑगस्ट रोजी अँटॉप हिल येथून तब्बल २१८ कोटीचे बनावट पनीर जप्त करत नष्ट केले. त्याचप्रमाणे दहिसर येथे ४७८ लिटर दूध नष्ट केले.

गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र, दसरा व दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाने ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या अभियानांतर्गत ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत ११ ऑगस्टपासून आतापर्यंत ४२ आस्थापनांची तपासणी करत ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेत उर्वरित साठा जप्त केला आहे. २५ ऑगस्ट रोजी एफडीए व मुंबई पोलीस यांनी संयुक्तरित्या अँटॉप हिल येथे केलेल्या कारवाईत लेबल नसलेल्या चीज ॲनालॉग (बनावट पनीर) या पनीर सदृश्य अन्न पदार्थाची विक्री होत असल्याचे आढळले. या ठिकाणाहून चीज ॲनालॉगचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन ५४ हजार ६२५ रुपयांचा २१८ किलो वजनाच्या चीज ॲनलॉगची पनीर म्हणून विक्री होऊ नये यासाठी तो नष्ट करण्यात आला.

त्याचप्रमाणे १९ ऑगस्ट रोजी एफडीए व मुंबई पोलीस यांनी दहिसर पूर्व येथे धाड टाकून विविध कंपन्याच्या पॅक्ड दूधाचा २९ हजार २७७ किमतीचे ४७८ लिटर इतका दूध साठा नष्ट करण्यात आला. वरील सर्व नमुने विश्लेषणा करिता प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही घेण्यात येईल.

गणेशोत्सवादरम्यान मिठाई खरेदी करताना घ्या काळजी

मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी पाकीटावर बॅच नंबर, लॉट नंबर, युज बाय डेट तसेच उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक इत्यादी माहिती बघून तपासूनच खरेदी करावे. त्याबाबतची खरेदी बिल घेण्यात यावी जेणेकरून फसवणूक होणार नाही. अशा स्वरूपाची माहिती नसेल तर पदार्थ खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. आपण घेत असलेली मिठाई ताजी व सकस आहे का याची खातरजमा करावी.

नागरिकांना आवाहन

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास किंवा कुठेही मावा अथवा खवा चांगल्या दर्जाचा वापरला जात नाही असे निदर्शनास आल्यास त्याबाबत सविस्तर माहिती १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.

हेही वाचा : मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’

ज्या आस्थापनांमध्ये तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
– मंगेश माने, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *