
मुंबई :
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले. यामध्ये हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीएसएमटी परिसरातील दुकाने आणि हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिवसभर हॉटेल, दुकाने बंद राहिल्याने आंदोलकांच्या जेवणाची गैरसोय झाली. तर आंदोलन पंधरा दिवस चालेल याचा अंदाज घेऊन मराठा आंदोलक पंधरा दिवसांचे अन्नधान्य घेऊन आझाद मैदान परिसरात दाखल झाले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात एक दिवसाचे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरातील हजारो मराठा बांधव रात्रीपासूनच आझाद मैदान परिसरात दाखल होत होते. आंदोलन सुरु होण्यापूर्वीच आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी झाली होती. रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करण्यात आली होती. यामुळे सकाळपासूनच महापालिका मार्ग आणि दादाभाई नैरोजी मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग पूर्णतः ठप्प झाले. यामुळे या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली.
सकाळी आंदोलक आक्रमक होते. मात्र दुपारी मुंबईत पावसाने जोर धरल्याने रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आंदोलक पावसापासून बचाव करण्यासाठी सीएसएमटी स्थानक, इमारतीच्या खाली ठाण मांडून बसले. तर काही आंदोलकांनी आपल्या वाहनांचा आसरा घेतला. आंदोलकांनी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी स्वतः पंधरा दिवसांचे अन्नधान्य सोबत आणले आहे. अनेक आंदोलकांनी स्वतःच्या गाडीमध्येच जेवण बनून खालले. तर काहींनी सीएसएमटी परिसरातील लहान स्टॊलवर मिळेल ते खाऊन दिवस ढकलला.
सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्ग आणि आझाद मैदाना लगतची खाऊगल्लीत दररोज तुफान गर्दी असते. मात्र आज सर्वत्र मराठा आंदोलकांची गर्दी पाहण्यास मिळत होती. आंदोलनामुळे भुयारी मार्गातील दुकाने, भुयारी मार्गाबाहेरील आराम हॉटेल देखील बंद ठेवण्यात आल्याने आंदोलकांची जेवणाची मोठी गैरसोय झाली.
आमदार रोहित पवारांचा आरोप
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभागाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले.