
मुंबई :
एक मराठा, लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, असा जयघोष करत आंदोलक आझाद मैदानाकडे जात होते. हलगी- ढोल ताशे वाजवत नाचणारे आंदोलक ठिकठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर ‘पाटील’ घोषणाही काही आंदोलक देत होते. अशा विविध घोषणांनी सीएसएमटी परिसर दणाणला.
आझाद मैदान आणि परिसरात आंदोलन करणारे आंदोलक पाऊस सुरु होताच सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले. भुयारी मार्ग, अगोदरच अनेक आंदोलकांनी रेल्वे फलाट, तिकीट घर आणि स्थानक परिसरात गर्दी केली होती. यामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक स्थानकात येऊ लागल्याने सीएसएमटी स्थानकात तुफान गर्दी झाली. आंदोलकांनी आपल्या गाड्या विविध ठिकाणी पार्किंग केल्या होत्या. या गाड्या पकडण्यासाठी आंदोलक लोकल पकडून पुढे जात होते. लोकल सीएसएमटी स्थानकातच भरत असल्याने अन्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. महिला डब्यातून आंदोलक प्रवास करत असल्याने लोकल प्रवाशांची गैरसोय झाली.
मराठा आंदोलकांनी चालत गाठले आझाद मैदान
आंदोलनासाठी मराठा बांधव शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत दाखल होत होता. बहुतांश आंदोलक हे चार चाकी वाहनांमधून मुंबईकडे कूच करत होते. सकाळी आंदोलकांनी इस्टर्न फ्री वे, सीएसएमटी परिसरात वाहने पार्किंग केली. त्यामुळे सकाळपासूनच दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. आंदोलकांनी काळाचौकी, रे रोड, शिवडी आदी परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करून लोकलने आझाद मैदान गाठले. मुंबईत वाहतूक कोंडी झाल्याने अखेर पोलिसांनी आंदोलकांची वाहने मुंबईच्या वेशीवरच अडवली.
आझाद मैदानात चिखल
पावसामुळे आझाद मैदानात पाणी साचले. तसेच आंदोलक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करत असल्याने आझाद मैदानात चिखल झाला. जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी केवळ स्टेज उभारण्यात आल्याने इतर आंदोलकांना उभे राहण्याची वेळ आली. सायंकाळी पुन्हा पाऊस कमी झाल्याने आझाद मैदानात पुन्हा गर्दी झाली.
पावसामुळे मराठा आंदोलक पांगले
सकाळपासून आझाद मैदान परिसरात हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. त्यामुळे सीएसएमटी परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झाले. सकाळी काही वेळ विश्रंती घेणाऱ्या पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली. आंदोलनाला आलेले बहुतांश आंदोलक छत्री, किंवा रेनकोडशिवाय मुंबईत आले. पावसाने जोर धरल्याने भिजलेल आंदोलक अखेर रस्त्यावरून बाजूला झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ सुरु झाली. पावसामुळे आझाद मैदानातील आंदोलकांनी संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली. पाऊस कमी झाल्यानंतर आंदोलक पुन्हा रस्त्यावर आल्याने या परिसरात पुन्हा वाहतूक ठप्प झाली.
पाणी, शौचालयांची गैरसोय
आंदोलनासाठी आलेल्या हजारो मराठा बांधवांची पाणी, शौचालयांमुळे गैरसोय झाली. सीएसएमटी परिसरात पिण्याचे पाणी आणि शौचालये नसल्याने आंदोलकांनी आझाद मैदानातील शौचालये, सीएसएमटी स्थानकातील शौचालयांचा आधार घेतला. तर आझाद मैदानात केवळ एक फिरते शौचालये उपलब्ध करून देण्यात आल्याने आझाद मैदानातील आंदोलकांची मोठी गैरसोय झाली.