
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आझाद मैदानात आंदोलनाला बसले असताना शुक्रवारी रात्री अनेक आंदोलकांनी थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांग लावत ‘मराठा आरक्षण मिळू दे असे साकडे थेट गणपतीच्या चरणी केले. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्री तीन तास रांग लावून दर्शन घेतल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी आंदोलक शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आले. मात्र मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ठाण मांडले आहे, तर अनेक आंदोलक मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील आपल्या नातेवाईक व मित्रपरिवारांकडे राहण्यास गेले आहेत. मात्र त्यापूर्वी अनेकांनी भायखळा स्थानकामध्ये उतरून थेट लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेत तब्बल तीन ते चार तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी आंदोलकांनी ‘मराठा आरक्षण मिळू दे असे साकडे लालबागच्या राजाच्या चरणी केल्याची माहिती मराठा आंदोलक गजानन होसबे यांनी दिली. किनवट तालुक्यातून आलेल्या गजानन होबसे यांच्यासह १० ते १५ मराठा आंदोलकांनी यावेळी गणपतीचे दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शुक्रवारी रात्री १२ वाजता गेलो होतो. यावेळी दर्शनासाठी भली मोठी रांग होती. या रांगेमध्ये तब्बल तीन तास उभे राहिल्यानंतर आम्ही लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याचे रणजित चव्हाण व विजय जाधव या मराठा आंदोलकांनी सांगितले. यावेळी आम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश येऊ दे आणि आम्हाला मराठा आरक्षण मिळू दे अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना केल्याचेही रणजित पाटील याने सांगितले. यावेळी अनेक मराठा आंदोलक लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर आंदोलकांनी आपल्या नातेवाईक व मित्रपरिवारांच्या घरी गेले तर काही आंदोलकांनी शुक्रवारची रात्र रेल्वे स्थानकांवर काढली.
हेही वाचा : मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू
मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत. अटल सेतू, पूर्वमुक्त महामार्गावर व लोकलने आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे आंदोलकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.