
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांची राहण्याची, जेवणाची, शौचालयाची व्यवस्था नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र आंदोलकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी मराठा समाजाच्या व्हॉट्सअपवर एक संदेश व्हायरल होत आहे. यामध्ये आंदोलकांनी केवळ १० रुपयाचे रेल्वेचे परतीचे तिकिट काढावे असे आवाहन करण्यात आले आहे. या परतीच्या तिकिटामुळे आंदोलकांना रेल्वे स्थानकांतील पिण्याचे पाणी, शौचालयाचा लाभ घेऊन दोन दिवस स्थानकात राहता येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावरील उपहारगृहांमध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही होऊ शकते, असेही या संदेशात म्हटले आहे.
मुंबईत लाखोंच्या संख्येन हजर राहिलेल्या मराठा आंदोलकांमुळे सर्व परिसर भगवामय झाला आहे. मात्र या आंदोलकांना मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छतागृह, शौचालय व पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने आंदोलकांची गैरसोय झाली आहे. ही गैरसोय लक्षात घेता मराठा समर्थकांकडून आंदोलकांसाठी व्हाॅट्सअपवर संदेश प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावरील फलाट तिकिट घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या मार्गावरील परतीचे तिकीट काढा, असा सल्ला दिला आहे. हे तिकीट केवळ १० रुपयांचे असून ते दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत वापरता येते. त्यामुळे अवघ्या १० रुपयांमध्ये रेल्वे स्थानकांवर दोन दिवसांची राहण्याची सोय होऊन रेल्वे स्थानकावरील शौचालये व स्वच्छतागृह वापरता येणार आहे. रेल्वे स्थानकांवर पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मोफत उपलब्ध होते, असा उल्लेखही या संदेशामध्ये करण्यात आला आहे.
रुग्णालयांमधील उपहारगृहांमध्ये जेवणाची सोय
आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स बंद ठेवण्यात आली असली तरी रेल्वे स्थानकातील आणि या परिसरातील दवाखान्यातील उपहारगृह बंद ठेवता येणार नाहीत. त्यामुळे ज्या मराठा बांधवाच्या जेवणाची गैरसोय होत असेल, त्यांनी या आंदोलन परिसरातील रुग्णालयांमधील उपहारगृहांचा वापर करावा. तसेच ही रुग्णालये शोधण्यासाठी गुगल लोकेशनचा वापर करावा, असाही सल्ला या संदेशामध्ये देण्यात आला आहे.
मराठा आंदोलकांची सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये राहण्याची व्यवस्था
वाशी रेल्वे स्थानकाजवळील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्रामध्ये ३० ते ४० हजार बांधवांसाठी राहण्याची, खाण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुंबई, नाशिक, पुणे, नवी मुंबईमधील बांधवांनी या मराठा आंदोलकांना मदत करावी, असे आवाहन केले आहे.