
मुंबई :
मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर सकाळीच मराठा आंदाेलकांनी ठिय्या मांडले. यामुळे या परिसरातून फोर्ट, गिरगाव, टपाल कार्यालय, मंत्रालय, जे.जे. उड्डाणपूल या परिसराकडे जाणारे रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या समोरील सर्व रस्त्यांवर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. या परिसरात तीन रुग्णालये असल्याने या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांना मात्र आंदोलकांकडून वाट करून दिली जात आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार करत मनोज जरांगे यांनी शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच शनिवारीही मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत दाखल झाली नाही. मात्र सरकारकडून मुंबईमध्ये आंदोलकांच्या जेवणाची, स्वच्छतागृहाची कोणतीच व्यवस्था केली नाही. सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शनिवारी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यातच या परिसरातील हाॅटेल, टपरी बंद असल्याने आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावरच आंदोलकांनी शेगडी पेटवत नाष्टा व जेवण बनविण्यास सुरुवात केली. या परिसरात मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने फोर्ट, गिरगाव, टपाल कार्यालय, मंत्रालय, जे. जे. उड्डाणपूल या दिशेने जाणारी व त्या दिशेने येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. जे.जे. उड्डाणपुलाच्या दिशेने येणारी वाहतूक ही भायखळ्यापर्यंत पोहचली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी बेस्टच्या बस व अनेक गाड्या अडकल्या होत्या. याचा परिणाम पूर्व मुक्त महामार्गावरील वाहतूक कोंडीवरही झाला. या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे या मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांग लागली होती. पूर्व मुक्त महामार्गावरील गाड्यांची रांग ही पी.डीमेलो रोडपासून जवळपास डॉकयार्ड रोडपर्यंत या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी आझाद मैदानात आंदोलन करण्यात यावे, जेणेकरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवाहन केले जात होते. मात्र आंदोलक हटण्यास तयार नसल्याने पोलिसांची अडचण होत होती.
शीघ्र कृती दल सज्ज
सरकारकडून कोणतीच सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आली नसल्याने शनिवारी सकाळी मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झाले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असताना आंदोलक ऐकत नसल्याने पोलिसांकडून शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आले होते.