
दुबई :
दुबईत वास्तव्यास असलेली भारतीय वंशाची भावंडे जीविका धीरज जैन (वय १०) आणि जैनम धीरज जैन (वय १३) यांनी केवळ लहान वयात आयजीसीएसई १०वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दुबईमध्ये लहान वयात दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी जागतिक पातळीवर नवा आदर्श निर्माण केला आहे.
सुरुवातीला JJFunTime या यूट्यूब चॅनेलवरून कंटेंट क्रिएटर म्हणून प्रवास सुरू केलेल्या या दोन्ही भावंडांनी विज्ञान प्रयोग, शैक्षणिक विषय व सर्जनशील आव्हाने मांडत शिक्षणाविषयीची जिज्ञासा वाढवली. शैक्षणिक यशाबरोबरच त्यांनी 1XL या जागतिक बिझनेस एज्युकेशन प्लॅटफॉर्मची सहसंस्थापना केली आहे तसेच ते दोघेही TEDx स्पीकर्स आहेत.
दुबईतील भावंडांचा प्रेरणादायी प्रवास
२०२५ मध्ये त्यांनी ExamMission105 अंतर्गत फक्त ६५ दिवसांत परीक्षेची तयारी केली. पुढील ४० दिवसांत परीक्षा पूर्ण केली. आरोग्य समस्या व व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी शिस्त व चिकाटीने हे ध्येय साध्य केले. या भावंडांनी याआधी ५० दिवसांत ५० पुस्तके वाचन, ५० नवीन कौशल्ये, १२० कार्यक्रमांचे आयोजन अशी आव्हाने पूर्ण केली होती. त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी “Dreams to Reality” या पुस्तकातून मांडला आहे. जैन भावंडांना CYL सुपरहीरो पुरस्कार, बालरत्न पुरस्कार, जैन स्टार पुरस्कार (महाराष्ट्र शासन) व नॅशनल यंग अचीव्हर्स अवॉर्डसह अनेक सन्मान मिळाले आहेत.
हेही वाचा : दुखापतीतून सावरल्यानंतर क्रिकेटपटू ते राष्ट्रीय सायकलस्वारापर्यंत झेप
जैनम (१३) म्हणाला, “शिकण्यासाठी वय हा अडथळा नाही. शिस्त, नियोजन आणि एकाग्रतेने सर्व काही शक्य आहे.” जीविका (१०) म्हणाली, “हे यश केवळ गुणांबद्दल नाही, तर आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्य याबद्दल आहे.” त्यांचे पालक डॉ. धीरज जैन व डॉ. ममता जैन यांनीही या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत मुलांच्या सेवा भावनेचा विशेष उल्लेख केला.