
मुंबई :
राज्य सरकारचे स्पष्ट आदेश दिले असूनही रात्रशाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचे पगार अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षक भारती संघटनेतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून ९ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांना पगार न झाल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालकांची शुक्रवारी भेट घेऊन पगारप्रश्नी भूमिका मांडली. गणेशोत्सवापूर्वी सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, अशा सूचना शासनाने दिलेल्या असताना रात्रशाळा व ज्युनिअर कॉलेजच्या जुलै पेड इन ऑगस्ट वेतनाची देयकंही अद्याप जमा झालेली नाहीत. त्यामुळे ऑगस्टची बिलेही उत्तर, दक्षिण व पश्चिम विभागीय वेतन कार्यालयांकडून विनाकारण नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा : मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू
संघटनेच्या म्हणण्यानुसार, बेकायदेशीरपणे पगार रोखल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “तातडीने बिले स्वीकारून वेतन अदा न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होतील,” असा इशारा कार्याध्यक्ष सुभाष मोरे मोरे यांनी दिला. यावेळी शरद गिरमकर, ईश्वर आव्हाड, अशोक शिंदे, राधिका महांकाळ, अकबर खान, भगवान बडगुजर, मदन दुबे, रवी कांबळे, गवरे, भामरे, पाखरे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.