ब्लॉग

हाफकिन महामंडळाच्या सुवर्ण जयंतीनिमत्त हाफकिन यांच्या कार्याचा घेतलेले आढावा

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची आज सुवर्ण जयंती असून १ सप्टेंबर १९७५ रोजी स्थापन झालेल्या महामंडळाने आज ५१ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त हाफकिन यांच्या कार्याचा आणि हाफकिन जीव – औषध निर्माण महामंडळाच्या सुवर्ण कामगिरीचा घेतलेला वेध…

सॅन्डहर्स्ट नावाचे रेल्वे स्टेशन मुंबईतील मध्य व हार्बर लाइनवर आहे. ब्रिटिश गव्हर्नर असलेल्या लॉर्ड सॅन्डहर्स्ट याने १८९९ साली प्लेग रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना परळ येथे केली. आणि रशियन शास्त्रज्ञ डॉक्टर हाफकीन यांची संचालक म्हणून संस्थेवर नेमणूक केली. पुढे १९२५ साली ‘प्लेग रिसर्च संस्थेचे’ नामकरण तत्कालीन ब्रिटिश सरकारने बदलून ‘हाफकिन संस्था’ असे केले या घटनेला आज १०० वर्षे पूर्ण होत आहे. हा दुग्धशर्करा योग आहे. जेव्हा डॉ. वाल्देमार मोर्डेकाय हाफकिन यांना प्लेग रिसर्च संस्थेचे नामकरण ‘हाफकिन संस्था’ असे केल्याचे कळल्यावर त्यांनी लेखी पत्र पाठवून खालील शुभेच्छा दिल्या होत्या :-

“मुंबई येथे केलेले काम हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता आणि तो किती चांगला काळ होता याबाबत स्पष्टीकरणाची मला गरज वाटत नाही. माझे सर्वस्व, सर्व भावना या येथील वास्तूशी जोडल्या गेल्या आहेत. मी आशा करतो की देशातील आरोग्य संघटनेच्या वतीने हाफकिन संस्थेची उत्कर्षता करणे हेच सक्रिय काम असावे आणि तेथील कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभाशिर्वाद पाठवितो.”

पहिल्या जागतिक महायुध्दातील कार्य :

१८ व्या शतकाच्या शेवटी प्लेग सारख्या अत्यंत दुर्धर आजाराने अनेकांचे प्राण जात होते. मुंबई, पुणे व भारतातील इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लेगने जीवितहानी होत होती. अशावेळी डॉ. हाफकिन यांनी संशोधन केलेल्या प्लेग लसीमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. प्लेग रिसर्च लॅबोरेटरी म्हणून १८९९ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ‘बॉम्बे बॅक्टेरीयोलॉजीकल लॅबोरेटरी’ असे नामकरण सन १९०५ साली करण्यात आले. देशात सर्वप्रथम सन १९२२ साली ‘ॲण्टी रेबीज व्हॅक्सीन’ हाफकिनमध्ये तयार करून देशातील गोरगरीब जनतेकरिता उपलब्ध करून देण्यात आले. सन १९१४ साली पहिल्या जागतिक महायुध्दातील दुषित पाणी आणि अन्नामुळे ‘इन्टेरिक फिवर’ या विषमज्वरामुळे आजारी पडलेल्या सैनिकांवर हाफकिनमध्ये उपचार केले जात असे. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील करावयाच्या उपचाराबाबत येथे प्रशिक्षित केले जात असे. याप्रकारे पहिल्या जागतिक महायुध्दात ‘इन्टेरिक डेपो’ म्हणून हाफकिन संस्थेने कार्य केले होते. त्यावेळची ‘बॉम्बे बॅक्टेरीयोलॉजीकल लॅबोरेटरी’ म्हणजे सध्याचे ‘हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ’ हे देशातील गोर गरीब जनता, सैनिक सर्वांसाठी एक संजिवनी आहे. या हाफकिन संस्थेची कार्यपध्दती व त्याबद्दल माहिती जाणून घेणेकरिता महात्मा गांधी यांनी हाफकिन संस्थेला सन १९३५ साली भेट दिली.

डॉ. वाल्देमार मोर्देकाय हाफकिनची गोष्ट

इ.स.१८७० च्या दशकातील ही डॉ. वाल्देमार मोर्देकाय हाफकिनची गोष्ट आहे. रशियातील बदर्यान्स्क या शहरातील मोर्देकाय हाफकिन यांचा लहान मुलगा वाल्देमार हाफकिन यांचे शालेय शिक्षण संपले होते. परीक्षेत वाल्देमार यांचा पहिला नंबर आला होता. त्यामुळे शहरातील महाविद्यालयामध्ये प्रवेश नक्कीच मिळणार होता. परंतु आता पुढील शिक्षणासाठी ओदेसा या शहरामध्ये कसे पाठवायचे हा प्रश्न त्यांच्या वडिलांना पडला होता. पंरतु वाल्देमार हाफकिनचे एकच ध्येय होते की, ‘मला पुढे शिकायचे आहे’. या वेळी वाल्देमार हाफकिन यांचा मोठा भाऊ पुढे आला व पुढील शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाची मदत करायला तो तयार झाला. मोठया भावाचे शिक्षण अपुरे होते व तो एका ठिकाणी नोकरी करीत होता. आपले शिक्षण पूर्ण नाही झाले म्हणून वाल्देमारचे तरी पूर्ण व्हावे ही त्याची इच्छा होती. मोठ्या भावाने पैशांची व्यवस्था केली. वाल्देमार हाफकिन यांना गावापासून ३०० मैल दूर असलेल्या ओदेसा शहरामध्ये पुढील शिक्षणाकरिता पाठविले. वाल्देमार हाफकिन यांचे एकच स्वप्न होते, त्यांना संशोधक व्हावयाचे होते. त्यावेळी रशियामध्ये ज्यू लोकांविरूध्द वातावरण गरम होते. रशियामधील दारिद्रय हे ज्यू लोकांमुळेच आलेले आहे असा समज धरून रशियन जनता ज्यूं विरोधी उठाव करीत होती. ज्यू लोकांना फारच हालअपेष्टा, अपमान, कोंडमारा सहन करावा लागे. त्यामुळे कित्येक होतकरू ज्यू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले होते. अनेक ज्यू तरूण घातपाती कृत्ये करणाऱ्या संघटनांमध्ये सामील होत होती. त्यामुळे त्यांना झारच्या तुरूंगात डांबून ठेवले जायचे तर काहींना फाशी दिली जात होती. या अशा कठीण प्रतिकूल परिस्थितमध्ये वंशाने ज्यू असलेले वाल्देमार हाफकिन यांच्या पुढे दोन मार्ग होते. एक म्हणजे आपल्या ज्ञातिबांधवांसाठी स्वार्थत्याग करायचा आणि संघटनांमध्ये सामील होणे. आणि दुसरा म्हणजे शास्त्राध्ययनाने संशोधक बनायचे आणि आपल्या ज्ञातीचे नाव उजळ करायचे यापैकी वाल्देमार हाफकिन यांनी दुसरी गोष्ट स्विकारली.

विश्वविद्यालयामध्ये वाल्देमार हाफकिन यांचा विशेष संबंध आला तो जीवशास्त्राचे प्राध्यापक प्रो. मेच्निकोव्ह यांच्याशी. जंतूंवर त्यांचे संशोधन चालू असे पुढे याच प्राध्यापकांना नोबेल पारितोषिकदेखील मिळाले. प्रो. मेच्निकोव्ह सारखे गुरू वाल्देमार यांना लाभले या बाबतीत ते सुदैवी ठरले. मोठया भावाने पाठविलेल्या दरमहा दहा रूबलमध्ये वाल्देमार शिकत होते. राहण्यासाठी चांगली जागा नव्हती, जेवणाला पुरेसे पैसे न उरल्यामुळे कित्येक वेळा ते उपाशी रहात असे. परंतु ज्ञानाच्या साधनेमध्ये वाल्देमार इतके गर्क होते की, या उणिवांकडे त्यांचे लक्ष जात नसे. आपल्या ज्यू समुदायाला न्याय कसा काय मिळवून दयायचा या विषयी ते नेहमी विचार करीत असे. ‘जनतेची इच्छा’ नामक ज्यू लोकांची एक दहशतवादी संघटना होती. वाल्देमार हे तरूण असल्यामुळे ज्यू लोकांवरील अन्यायाविरूध्द लढा लढायला त्यांचे रक्त सळसळत होते. पोलिसांनी वाल्देमार हाफकिन यांना अटक केली पंरतु हाफकिन यांच्या खोलीत काही आक्षेपार्ह न आढळल्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडले व त्यांच्यावर सक्त नजर ठेवली. त्यामुळे हाफकिन यांच्यामध्ये अबोलापण, घुमेपणा आला. आपल्या मताच्या प्रचारासाठी ते कोणाशी वादविवाद करीत नसे. पुढे १ मार्च १८८१ रोजी सेंट पिटर्सबर्ग येथे बॉम्बचा स्फोट होवून झार दुसरा अलेक्झांडर मारला गेला. झारला ज्यूंनी मारले असा समज पसरवून ज्यू लोकांना अमानुषपणे मारण्यात आले. काहींना तडीपार करण्यात आले. त्यामुळे वाल्देमार हाफकिन यांना पोलिसांनी पकडले. परंतु त्यांचे गुरू प्रो. मेच्निकोव्ह यांच्या वजनामुळे हाफकिन सुटले. प्रो. मेच्निकोव्ह यांनी ‘ज्या वयामध्ये ज्ञानाची साधना करावयाची, त्या वयात हे असले भलतेसलते उद्योग आणी उपद्व्याप करू नका’ अशी समज हाफकिन यांना दिली. परंतु हाफकिन यांच्या तरूण सळसळत्या रक्ताला त्यांच्या गुरूंचे म्हणणे तितकेसे पटले नाही. शासनाने दहशतवादी चळवळींना दडपून टाकण्यासाठी स्त्रोल्निकोव्ह या क्रुर अधिकाऱ्याची खास नेमणूक केली. या स्त्रोल्निकोव्हला ठार मारण्याच्या कटामध्ये अनेक संघटना सामील होत्या. हाफकिन या चळवळीमध्ये ओढला गेला. ज्या तारखेला स्त्रोल्निकोव्हला मारायचे होते त्याच दिवशी हाफकिनला पोलिसांनी पकडले व नेव तुरूंगामध्ये टाकले. त्यावेळेचे तुरूंग म्हणजे नरक असे. नीट बसायला देखील जागा नसे, जमीनीला खाचखड्डे, गारगार जमिनीवर चारआठ दिवस झोपले की, कैद्याला न्युमोनिया किंवा क्षय होई. कुत्रा देखील तोंड लावणार नाही असे अन्न कैद्यांना देण्यात येत असे. कोणी याविषयी तक्रार केली तर “तडफडून मर, तुही सुटलास आम्हीही सुटलो” असे सांगण्यात येई. या अशा तुरूंगामध्ये हाफकिनला ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांना गुरू प्रो. मेच्निकोव्ह यांचे म्हणणे पटू लागले. पुढे सुदैवाने हाफकिन सुटले. या चळवळींपासून ते आता लांब राहू लागले.

हेही वाचा :  दुबईतील जीविका व जैनम लहान वयातच झाले दहावी परीक्षा उत्तीर्ण

‘जीवजातींची उत्पत्त्ती’ हा महान ग्रंथ लिहिणाऱ्या चार्ल्स डार्विन यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गणी जमा करण्याचे ठरविले. शिक्षण मंत्र्यांना हे समजल्यावर त्यांनी या विद्यार्थ्यांची धरपकड करण्याचे आदेश दिले. याविषयी प्रो. मेच्निकोव्ह चिडले व त्यांनी विश्वविद्यालय सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण जर प्रो. मेच्निकोव्ह सारखे प्राध्यापकांनी विश्वविद्यालय सोडले तर विश्वविद्यालय बंद होईल. त्यांना थांबविण्यात यावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहिम राबविली. त्या सहयांचे पेपर्स विश्वविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविले. सहया करणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्वविद्यालयातून काढूनही टाकण्यात येईल हे माहित असतानादेखील हाफकिन यांनी आपल्या गुरूंसाठी सही केली. पुढे प्रो. मेच्निकोव्ह यांना थांबविण्यात आले. धरपकड झालेल्या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. मध्यंतरीच्या तुरूंगवासामुळे हाफकिन यांचा सर्व आधार तुटला होता. जेवण, राहणे, पुस्तके, फी याकरिता हाफकिन यांनी शिकवण्या सुरू केल्या. ते सकाळी श्रीमंतांच्या मुलांना त्यांच्या घरी जावून शिकवू लागले. रात्री स्वतःचा अभ्यास करू लागले. कोणाशी एक नाही दोन नाही. हाफकिन यांना परीक्षेत घवघवीत यश मिळाले. त्यामुळे विश्वविद्यालयात प्राध्यापकाची त्यांना नोकरी मिळत होती, पंरतु ज्यू धर्म सोडून ख्रिस्ती धर्माची दिक्षा घेणे अनिवार्य होते. हाफकिन यांना हे पटले नाही त्यांनी ती नोकरी नाकारली. पुढे एका प्राणि संग्रहालयात ते तांत्रिक नोकर म्हणून काम करू लागले.

हेही वाचा :  दुखापतीतून सावरल्यानंतर क्रिकेटपटू ते राष्ट्रीय सायकलस्वारापर्यंत झेप

काही दिवसांनी हाफकिन यांनी रशिया सोडून स्विझलंड गाठले. तेथे जिनिव्हा विश्वविद्यालयात शरीर शास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. गुरू प्रो. मेच्निकोव्ह हे पॅरिस येथील पाश्चर संस्थेमध्ये काम करीत होते. प्रो. मेच्निकोव्ह यांना आपला शिष्य हाफकिन आपल्याबरोबर असावा म्हणून त्यांनी हाफकिन यांना सहायक ग्रंथपाल पदाची नोकरी देऊ केली. हाफकिन यांच्या पदाला ही नोकरी शोभणारी नव्हती, परंतु पाश्चर सारख्या नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळणार होती. तें लगेचच पाश्चर संस्थेमध्ये रूजू झाले. सकाळी ग्रंथपाल सहायक व रात्री प्रयोगशाळेमध्ये ते संशोधन करू लागले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवडीचे व्हायोलीन ते वाजवित असे. एके दिवशी आनंदाचा क्षण आला. पाश्चर संस्थेचे प्रमुख डॉ रॉक्स यांचे मदतनिस संशोधक यार्सिन इडोची हे प्लेगवर संशोधन करीत होते, परंतु काही कारणास्तव त्यांना ते संशोधन अर्ध्यावर सोडून निघून जावे लागले. निघण्यापूर्वी त्यांनी लिहीले होते, “माझ्या जागी वाल्देमार हाफकिन यांची नेमणूक करावी कारण त्यांना प्रयोगशाळेविषयी इत्यंभूत माहिती आहे”. या पत्रातील दोन ओळींनी डॉ वाल्देमार मोर्देकाय हाफकिन यांचे आयुष्य बदलले. वयाच्या ३० व्या वर्षी ते संशोधक म्हणून पाश्चर संस्थेमध्ये नियुक्त झाले.

डॉ हाफकिन यांचा जगभरात झालेला सन्मान :

* राणी व्हिक्टोरीयाच्या राजपदाला ६० वर्षकाळ पूर्ण झाल्याच्या प्रसंगी राणी व्हिक्टोरीया यांनी स्वतःच्या हस्ते २२ जून १८९७ रोजी डॉ. वाल्देमार मोर्देकाय हाफकिन यांना “कॅम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर” (सी.आय.ई.) असे नाव आणि विशेष पदक देवून गौरविण्यात आले. तप्रसंगी डॉ. हाफकिन यांनी मानव सेवेस केलेल्या असामान्य कार्याबद्दल ‘सी.आय.ई.’ नाव व विशेष पदक देवून त्यांच्या कार्याचा खालील प्रमाणे गौरवपर उल्लेख वाचण्यात आला.

* इसवी सन १८९९ साली डॉ. हाफकिन यांना ब्रिटनचे नागरिकत्वाचा बहुमान मिळाला. जून १८९९ साली गाला डिनर, लंडन येथील मक्कबी असोशिएशन यांनी डॉ. हाफकिन यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भारतातील जनआरोग्य क्षेत्रातील कामामध्ये अग्रेसर काम केल्याबद्दल त्यांना “Saviour of Mankind” “मानवजातीचा रक्षणकर्ता” अशी पदवी देण्यात आली.

* मानव सेवेत केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल इ.स. १९०१ साली एडिनबर्ग विदयापीठाने डॉ. हाफकिन यांना ‘केमरुन बक्षिस’ बहाल केले. ९२ युरो ही या पारितोषिकाची रक्कम होती. इसवी सन १९०३ साली ‘मनिला मेडीकल सोसायटी’ यांनी डॉ. हाफकिन यांची मानद सभासद म्हणून निवड करुन त्यांचा आदर केला.

* जानेवारी १९०९ मध्ये ‘इंस्टिटयुट दी फ्रान्स, ऍकॅडमी डीस सायन्सेस्’ यांनी डॉ. हाफकिन यांना प्रतिष्ठित अशा प्रिक्स ब्रायन्ट (Prix Briant) या पारितोषिकासाठी एकमताने निवड केली. ४००० फ्रान्क्स ही या पारितोषिकाची रक्कम होती सदर रक्कम हाफकिन यांना त्याच वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत मिळाली.

* इसवी सन १९०९ साली डॉ. हाफकिन यांची ‘कलकत्ता मेडिकल क्लब’ या संस्थेच्या मानद सभासदत्वासाठी निवड करण्यात आली. भारतातील प्रतिष्ठित अशा ‘इंडियन इंन्स्टिटयूट ऑफ सायन्स’ बँगलोर यांनी डॉ. हाफकिन यांची सदर इंन्स्टिट्यूटच्या सभासदासाठी निवड केली. सदर इन्स्टिटयूट हे डॉ. हाफकिन यांच्या मदतीने वर्षभरासाठी सुक्ष्मजंतूशास्त्राविषयी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, प्रयोगशाळा कार्यपद्धती विषयक शिक्षण देणे, हुशार गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना बॉम्बे येथील प्लेग रिसर्च लॅबोरेटरी येथे डॉ. हाफकिन यांच्या देखरेखीखाली विशेष प्रशिक्षणकरीता पाठविणे यासारखे उपक्रम राबवू लागले.

* इसवी सन १९०७ साली ‘लिवरपूल स्कुल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन’ यांनी प्रतिष्ठित असे ‘मेरी किंगस्ले पदक’ बहाल करुन डॉ. हाफकिन यांना गौरविण्यात आले. त्यावेळी मानवसेवेत केलेल्या असामान्य कार्याबद्दल डॉ. हाफकिन यांना मेरी किंगस्ले पदक देऊन त्यांच्या कार्याविषयी खालीलप्रमाणे गौरवपर उल्लेख वाचण्यात आला. “सन १८९७ पासून सहा मिलियनहून (६० लाख) अधिक प्रमाणातील डोसेज रोगप्रतिबंधक लसी जगभरातील लोकांना देण्यात आल्या. रोगप्रतिबंधक लसी दिलेल्यांपैकी दगावल्याची एकही घटना नाही. व त्यामुळे मृत्यूदर हा १/६ प्रमाणात कमी झालेला आहे. डॉ. हाफकिन यांनी शोधलेल्या पद्धतीनुसार इतर भयानक रोगांच्याही रोगप्रतिबंधक लसी तयार करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रतिष्ठित व किर्तीत भर घालणा-या गोष्टी डॉ. हाफकिन यांनी केल्या आहेत.”

इसवी सन १९१५ साली म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी डॉ. हाफकिन हे सेवेतून निवत्त झाले.

* १७ ऑगस्ट १९७७ रोजी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती श्री. व्ही. व्ही. गीरी यांच्या हस्ते ग्रान्ट मेडिकल कॉलेजच्या फार्माकोलॉजी विभागाच्या बाहेरील भिंतीवर संगमरवरी दगडावर डॉ. हाफकिनचे स्मृतीचिन्हाची स्थापना करुन त्याचे अनावरण करण्यात आले. सदर विभागामध्ये डॉ. हाफकिन यांनी प्रतिप्लेग लसीच्या निर्मितीबाबत ऐतिहासिक संशोधन केले होते.

हाफकिन संस्थेने व महामंडळाने केलेले कार्य :

  • १९२२ साली अँटी रेबीज लसीची निर्मिती
  • १९४५ साली धनुर्वात विरोधी अँटी टीटॅनस सिरम ची निर्मिती
  • १९६४ साली भारतीय बनावटीच्या पहिल्या पोलिओ प्रयोगशाळेची निर्मिती
  • १९९४ साली   प्लेग लसीची पुनर्निर्मिती
  • १९९५ साली सर्प उद्यानाची पिंपरी येथे स्थापना
  • १९९८ साली लायफीलाइज प्रकल्पाची पिंपरी येथे स्थापना
  • १९९९ साली जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक प्रमाणानुसार मुख्य लसीची निर्मिती आणि युनिसेफ द्वारे जगभरात लसीचा पुरवठा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *