
मुंबई :
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही. उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे शुक्रवारपाासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. रविवरपासून त्यांनी पाण्याचा त्याग केला असल्याने त्यांची प्रकृती खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून, सोमवारी दुपारी जरांगे यांना अशक्तपणा जाणवत असून, त्यांचा रक्तदाब ही कमी झाला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण पुकारले आहे. सलग तीन दिवस त्यांनी अन्नावाचून उपोषण केल्यानंतर रविवारपासून त्यांनी पाण्याचाही त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावण्याची शक्यता लक्षात घेत मुंबई पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार रविवारी मध्यरात्री १२ वाजता मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा चार डॉक्टरांच्या तुकडीने जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या तपासणीमध्ये जरांगे यांच्या रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यात आले. यामध्ये जरांगे यांनी पाण्याचे सेवन करण्याचे सोडल्याने त्यांना अशक्तपणाचा त्रास सुरू झाला आहे. तसेच त्यांचा रक्तदाब हा ९०/६० एमएम एचजी इतका कमी झाला असून, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ८५ एमजी/डीएल इतकी कमी झाली असल्याची माहिती सूत्रानी दिली. डॉक्टरांनी जरांगे यांच्या केलेला तपासणीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आहे.
हेही वाचा : ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी ५ उपाय
जरांगे यांच्या परवानगीनेच तपासणी शक्य
मनोज जरांगे यांना जाणवत असलेला अशक्तपणा व त्यांनी पाण्याचे सेवन करण्याचेही सोडल्याने आत डॉक्टरांनी त्यांची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र तपासणी करण्यासाठी परवानगी यांच्या परवानगीच आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय जरांगे यांची कोणतीही तपासणी करता येणार नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचे वातावरण
मनोज जरांगे मागील चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही. उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. एक तर मी मरेन किंवा आरक्षण घेईन, अशी घोषणाच जरांगे यांनी केली आहे. त्यातच आता जरांगे यांना अशक्तपणाबरोबरच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू ढासलत असल्याने आझाद मैदानामध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.