
मुंबई :
वंधत्वासारख्या समस्येमुळे तसेच लग्नाच्या १३ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबईतील एका जोडप्याला यशस्वी गर्भधारणा झाली आणि गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यात गर्भवती मातेने १.२ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाला जन्मजात क्षयरोगाचे निदान झाले जन्मल्यानंतर पुढची पाच महिने या बाळाने मृत्यूशी झुंज देत होते. जगण्यासाठी या बाळाने केलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून परेलच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये त्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. काही महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या या बाळाने अखेर मोकळा श्वास घेतला असून आता तो पूर्णपणे बरा झाला असून आपल्या घरी परतला आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील राहणारे असलेले निशांत आणि निलिमा गुप्ते (नाव बदलले आहे) या जोडप्याने एप्रिलमध्ये मुलाला जन्म दिला. ज्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. लग्नाच्या १३ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आणि वंध्यत्वाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर त्यांना झालेली ही अपत्याप्रातप्ती ही त्यांच्यासाठी चमत्कार पेक्षा कमी नव्हती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयव्हीएफद्वारे त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र जेव्हा त्यांच्या अकाली जन्मलेल्या व १.२ किलो वजनाच्या नवजात बाळाला गंभीर गुंतागुंतीते निदान झाले, तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जन्मानंतर पहिल्याच दिवशी बाळाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाला व्हेंटिलेटरवरून काढणे अशक्य होते. ज्यामुळे पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील वाडिया बाल रुग्णालयाकडे धाव घेतली.
बालरोग फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. परमार्थ चांदने सांगतात की, जुलैमध्ये जेव्हा बाळा आमच्याकडे उपचाराकरिता दाखल झाले तेव्हा बाळाच्या आरोग्याची स्थिती अत्यंत गंभीर होती, त्याला नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनची आवश्यकता होती. आईमध्ये वंध्यत्वाचा वैद्यकिय इतिहास आणि दोन्ही फॅलोपियन ट्युब काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया तसेच बाळाचा असामान्य छातीचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन यावरून असे दिसून आले की ते जन्मजात टीबीचे प्रकरण असू शकते, म्हणून ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली, ज्यामध्ये टीबीचे निदान झाले. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये जन्मजात टीबीचे निदान झाले, ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती असून त्यावर उपचार करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते.
डॉ. इरा शाह, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ सांगतात की, जन्मजात क्षयरोग हा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे जो गर्भधारणेदरम्यान किंवा जन्माच्या वेळी आईकडून बाळाला जातो. नवजात बाळांना श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, स्तनपानाचा स्विकार न करणे, चिडचिड होणे किंवा वजन न वाढणे यासारखी लक्षणे दिसून येतात. जन्मजात टीबी हा दुर्मिळ आजार आहे, कारण भारतात दरवर्षी याची १५ पेक्षा कमी प्रकरणं नोंदवली जातात. या प्रकरणात बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर आयसोलेशन वॉर्डमध्ये हलविण्यात आले. बाळावर टीबीचे उपचार सुरू करण्यात आले आणि उपचारानंतर या बाळामध्ये लक्षणीयरित्या सुधारणा दिसून आली, बाळ आता पूर्णपणे बरे झाले आहे आणि त्याचे वजनही वाढले असून आता ३.३ किलो इतके आहे . बाळाला ४० दिवसांनी घरी सोडण्यात आले आणि आता ते पूर्णतः बरे झाले आहे. जर मातेला जननेंद्रियाच्या क्षयरोगामुळे वंधत्वाची समस्या असेल आणि नवजात बाळाला श्वसनासंबंधी समस्येची लक्षणे दिसून येत असतील, तर जन्मजात क्षयरोगाचे निदान होण्याची शक्यता वाढते.
इतक्या संघर्षांनंतर आम्ही जवळजवळ आशा गमावली होती, परंतु वाडिया हॉस्पिटलने आमच्या बाळाला नवे आयुष्य दिले. एका कुटुंबासारखेच डॅाक्टरांनी आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिला. आमच्या बाळाला नवे आयुष्य मिळवून दिल्याबद्दल आणि आमचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आम्ही संपूर्ण टीमचे आभार मानतो असे बाळाचे वडील निशांत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : एसटीच्या अतिरिक्त जमिनींचा विकास करताना संघटनांचे मत विचारात घ्या – श्रीरंग बरगे
या प्रकरणाचे व्यवस्थापन करणे वैद्यकीय आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. हे बाळ अकाली जन्मले असून त्याला जन्मजात क्षयरोगाचे निदान झाले, जो एक अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. आमच्या एनआयसीयू आणि संसर्गजन्य रोग टिमने बाळावला यशस्वी उपचार पुरविण्याकरिता अहोरात्र प्रयत्न केले. या बाळाला बरे झालेले पाहणे हे आमच्यासाठी अमूल्य क्षणांपैकी एक आहे, असे बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले.