
मुंबई :
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असून ४ ते १० वयोगटातील मुलांना याचा वेगाने प्रसार होत आहे. मुलांबरोबरच २५ ते ६५ वयोगटातील प्रौढांना डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि इतर जलजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. तज्ञांनी सर्वच वयोगटातील व्यक्तींना सतर्क राहण्याचा, वैयक्तिक स्वच्छता राखण्याचा, साचलेले पाण्याचा निचरा करण्याचा, डास प्रतिबंधक फवारणी करण्याचा आणि फ्लूसाठी लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. वेळीच उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.
इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. ताप, खोकला, घसा खवखवणे,अंगदुखी, थकवा आणि नाक बंद होणे ही फ्लूची लक्षणे आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून दररोज सुमारे १०-१२ मुले फ्लू च्या लक्षणांसह ओपीडीमध्ये दाखल होत आहेत. डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे जो एडीस इजिप्ती डासामुळे पसरतो, जो साचलेल्या पाण्यात प्रजनन करतो. डेंग्यू झालेल्यांना ताप, डोकेदुखी, सांधे आणि स्नायूंमधील वेदना, पुरळ आणि काही प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. लहान मुलांमध्ये डेंग्यूमुळे गंभीर गुंतागुंत होते, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते किंवा जीवघेणी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अर्भकं आणि लहान मुले ही लक्षणांबद्दल बोलू शकत नाहीत आणि त्यांना डिहायड्रेशन होऊ शकते. मुसळधार पावसामुळे डासांच्या प्रजननासाठी योग्य स्थिती निर्माण होते, ज्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ असल्याची प्रतिक्रिया डॉ. अनिश पिल्लई(वरिष्ठ नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल्स, खारघर, मुंबई) यांनी व्यक्त केली.
डॉ. अनिश पुढे सांगतात की, ताप, पुरळ किंवा असामान्य थकवा यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये आणि त्याकरिता बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य हायड्रेशन राखणे, विश्रांती घेणे आणि व्यवस्थापनाने फ्लूचा सामना करण्यास मदत होते. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करुन हायड्रेटेड राहणे आणि मुलांमध्ये प्लेटलेट्सच्या संख्येचे सतत निरीक्षण करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या सर्व मुलांसाठी फ्लू लसीकरणाचा सल्ला दिला जातो. लसीकरण हा फ्लूसाठी सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, तसेच वारंवार हात धुणे आणि संक्रमित व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : आजोबा आम्हाला टेस्ला कार नको, शाळेत जायला एसटी पास मोफत द्या
मुलांप्रमाणेच, २५ ते ६७ वयोगटातील प्रौढांमध्येही मुसळधार पावसामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि फ्लू यासारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे पावसाळ्यात कॉलरा, टायफॉइड, हेपेटायटीस ए आणि ई आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारखे जलजन्य आजार वाढत आहेत. गाळून,उकळून थंड केलेले पाणी पिणे, हातांची स्वच्छता राखणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि फ्लू टाळण्यासाठी, डास प्रतिबंधक फवारणी करा, संपुर्ण अंग झाकणारे कपडे घाला, स्वच्छता राखा, साचलेले पाण्याचा निचरा करा आणि वेळेवेळी लसीकरण करा. पावसाळ्यात वारंवार बाहेर जावे लागत असल्यास डॉक्सीसायक्लिनच्या वापराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. उघड्यावरील अन्नपदार्थ , कच्चे आणि न शिजवलेले पदार्थ, थंड पेय आणि रस्त्यावरील चाट खाणे टाळा. मुसळधार पावसात प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला परळ ग्लेनईगल्स हॉस्पिटल वरिष्ठ इंटरनरल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दिला.