अमरावती :
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर आर्थिक प्रश्नावर राज्य सरकारने ४ ऑक्टोबर २३ रोजी नेमलेल्या त्री सदस्सीय समितीला घालून दिलेला दोन महिन्यांचा कालावधी कधीच संपला आहे. वेतनाचा तिढा सोडविण्यासाठी महिन्याला फक्त १६.५ कोटी रुपयांची गरज आहे. ते देण्याऐवजी फक्त समित्या नेमून वेळकाढू धोरण सरकारने चालवले आहे. टिव्हीवरील जाहिरातीत सहानुभूतीच्या गप्पा करणारे हे सरकार असून या सरकारच्या कामाचा एकंदर लेखाजोखा पाहता इतिहासातील सर्वात कंजूस सरकार म्हणून नोंद होईल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यानी केलीआहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील न्यू रॉयल पॅलेस हॉल येथे झालेल्या एसटी कामगारांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्थानिक माजी आमदार वीरेंद्र जगताप हे होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये अनुक्रमे ५०००, ४००० व २५०० रुपये अशी सेवाजेष्ठता न पाळता वेतन वाढ करण्यात आली. ही कामगार चळवळीच्या इतिहासातील सर्वात चुकीची वाढ आहे. जगात कुठेही वेतनवाढीचे संदर्भ तपासले तर वेतनवाढ करताना सेवाज्येष्ठता पाळली जाते, पण इथे ते न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात विसंगती निर्माण झाली आहे. सदरची विसंगती दूर करण्यासाठी महिन्याला फक्त १६.५ कोटी रुपयांची गरज आहे. असेही सरकार दर महिन्याला अडीचशे ते तीनशे रुपये सवलत मूल्य व वेतनासाठी देत आहे. त्याचप्रमाणे जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून सहानुभूती दाखविणारे हे सरकार ही रक्कम द्यायला तयार नाही. असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
२०२१ मध्ये झालेल्या वेतन वाढीतील त्रुटी दूर करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ करावी. वेतन वाढीतील त्रुटी दूर करीत असताना जुलै २०१८ पासूनच्या महागाई भत्त्याच्या मागील थकीत फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. सध्या महामंडळात सुरू असलेल्या शिस्त व आवेदन कार्यपध्दतीमध्ये सक्षम प्राधिकारी मनमानी पध्दतीने शिक्षा लागू करतात. त्यामध्ये बदल करण्यात येऊन कुठल्या चुकीला किती शिक्षा असावी याचे मापदंड घालून देण्यात यावेत. अपहार प्रकरणी वाहकाच्या करण्यात येत असलेल्या बदल्या करू नयेत. कोणत्याही अपराधाला बडतर्फी सारखी शिक्षा असूच नये. त्याच प्रमाणे सेवेत कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व निवृत्त कर्मचारी या दोघांनाही वर्षभरासाठी एस.टी. बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत प्रवासाची मुभा असावी.
सर्व आगारातील चालक, वाहक, यांत्रीकी कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच इतर कर्मचारी यांची विश्रांतीगृहे नादुरूस्त आहेत, व त्यांची पडझड झाली आहे. ती दुरूस्त करण्यात येवून अद्यावत सोयीसुविधा करण्यात याव्यात.एस.टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ ३ टक्के इतकी देण्यात येते. मधल्या काळात तात्कालीन सरकारने घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्के इतका केला होता. सध्या तो दर ३ टक्के इतका असून मधल्या काळातील सर्व थकीत फरक देण्यात यावा.अशी मागणीही या वेळी बरगे यांनी बोलताना केली. या वेळी कष्टकरी जनसंघ या संघटनेतील ११२ कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस या संघटनेत प्रवेश केला.
या मेळाव्याला संघटनेचे कार्याध्यक्ष दिनेश धुमाळे, नागपूर प्रदेशाचे प्रादेशिक सचिव विजय चंदनकर, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण नरोडे, विभागीय सचिव जयंत मुळे, विभागीय कार्याध्यक्ष चंद्रकांत देशमुख, प्रवीण चरफे, प्रमोद दिप्टे, आगार सचिव सचिन वानखडे -अमरावती, उज्वला घोटकर – वरुड, अमित पांडे – मोर्शी, वैभव धर्माळे -चांदुर बाजार, शेख हातीम -परतवाडा, योगेश कोकाटे – दर्यापूर, राजू सानप – बडनेरा, विक्की यादव -चांदुर रेल्वे, योगिता खंडारे -विभागीय कार्यालय, स्वप्नील ईश्वरकर – विभागीय कार्यशाळा आदी पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.