अमरावती :
एसटी महामंडळाच्या अमरावती व अकोला विभागातील बिंदू नामावली म्हणजेच सरळ सेवा भरती व खाते बढतीमध्ये जातनिहाय आरक्षण देण्याच्या पद्धतीत त्रुटी आढळण्याने अमरावती विभागाच्या मागासवर्गीय कक्षाच्या सहाय्यक उपायुक्तांनी बिंदू नामावली प्रक्रिया प्रमाणित झाली नसल्याने स्थगिती दिली होती. त्यामुळे २०१७ पासून अकोला व अमरावती विभागात सरळ सेवा भरती व बढती परीक्षा सुद्धा घेता आली नव्हती. २०१७ पूर्वी जे कर्मचारी बढती परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांना अद्यापपर्यंत नियमित किवा तात्पुरती बढती देण्यात आलेली नव्हती. यामुळे महामंडळाचे या दोन्ही जिल्ह्यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत होते. ते टाळण्यासाठी ही स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी, अशी मागणी घेऊन महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या नेतृत्वात संघटनेचे शिष्टमंडळ अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक उपायुक्त वैशाली पाथरे यांची भेट घेतली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अकोला व अमरावती विभागात एकंदर २७ पदातील दोन – चार जात प्रवर्गात कर्मचारी अतिरिक्त आहेत. त्याचप्रमाणे २०१७ पासून मागासवर्ग आयोगाच्या निर्बंधांमुळे सरळ सेवा भरती घेण्यात आलेली नसल्यामुळे बहुसंख्य पदातील कर्मचारी हे दैनंदिन कामासाठी कमी पडत आहेत. तसेच दोन्ही जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने या दोन्ही जिल्ह्यातील हजारो तरुणांना नोकरी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे नोकरीत असलेले जे कर्मचारी बढती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना नियमीत बढती न मिळाल्याने ते आर्थिक व मानसिक त्रासात आहेत. हे सुद्धा लक्षात आणून दिले. त्याचप्रमाणे बढती परीक्षा उत्तीर्ण झालेले बरेसचे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत पण त्यांना नियमित बढतीपासून वंचित राहावे लागले हेही लक्षात आणून दिले.
त्याचप्रमाणे अकोला व अमरावती जिल्ह्यातील बदली होत नसल्याने हजारो कर्मचारी कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात तसेच दूरच्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांनाही मानसिक त्रास होत आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पती पत्नी एकत्रीकरण व दुर्धर आजाराने आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बदल्या होत नसल्याने त्यांचेही नुकसान होत आहे. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे, असेही निदर्शनास आणून दिले. या शिवाय कर्मचारी अपुरे पडत असल्याने प्रवाशांना चांगली सेवा देता येत नाही. महामंडळाला चांगली संधी असताना सुद्धा उत्पन्न वाढीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे काही प्रवर्गातील जे कर्मचारी त्यांच्या जात प्रवर्गात जादा आहेत. त्यांच्यासाठी या दोन जिल्ह्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांवर अन्याय करणे योग्य नाही हे योग्य नसून, यातून तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात संघटनेचे कार्याध्यक्ष दिनेश धुमाळे, विभागीय सचिव जयंत मुळे, विभागीय कार्याध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्या वर सहाय्यक उपायुक्त मागासवर्गीय कक्ष वैशाली पाथरे यांनी ज्या पदाची बिंदू नामावली प्रक्रिया प्रमाणित झाली आहे. अशा पदांची भरती व बढती प्रक्रिया राबविण्यास काहीही हरकत नाही. तसे आदेश एसटीच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. त्यामुळे याचा लाभ बहुसंख्य कर्मचाऱ्यांना बढती परीक्षा व बदलीमध्ये होणार असल्याने सहाय्यक उपायुक्त वैशाली पाथरे यांचे आभार संघटनेतर्फे मानण्यात आले.